Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhary) यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी पदावरून निलंबित केल्यानंतर आता पुन्हा डॉ. चौधरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. कारण, डॉ. सुभाष चौधरी यांनी केलेले भ्रष्ट्राचाराचे प्रकरण बघता त्याच्या सीआयडी चौकशीची मागणी सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे. डॉ. चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी होत्या. राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार 21 फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते. मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.


डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना दिला होता. या अहवालात कुलगुरूंकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे, शासनाचे ‘एमकेसीएल’ संदर्भात आदेश असताना त्याची अवहेलना करण्यात आल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. परिणामी एकंदरीत या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी  (Dr. Subhash Chaudhary) यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले.


भ्रष्ट्राचाराप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी


‘एमकेसीएल’सोबत विद्यापीठाने केलेला करार 2015 मध्ये रद्द करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये राज्य शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून ‘एमकेसीएल’ला कोणतेही काम थेट देऊ नये, असे पत्र दिले होते. असे असतानाही विद्यापीठाने शासन निर्णय डावलत ‘एमकेसीएल’ला कंत्राट दिल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. त्या आधारावर डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या व्यतिरिक्त सुरक्षा गार्ड निविदा घोटाळा, बांधकाम घोटाळा, नियमबाह्यय नियुक्त्या, असे अनेक आरोप डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर असल्याने या सर्व प्रकरणाची एकत्र सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे.


तक्रारींची मालिका


नागपूर विद्यापीठ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात कायम वाद रंगताना बघायला मिळाला आहे. सोबतच परीक्षा संदर्भाची नियोजन असेल किंवा सिनेट कौन्सिल निर्णया संबंधीत कुलगुरू यांनी घेतलेले निर्णय असतील, या विरुद्ध विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी विरोधात अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या. मात्र ‘एमकेसीएल’ला कंत्राट दिल्याचा ठपका ठेवत डॉ सुभाष चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एकंदरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासातील ही कदाचित पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.


काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ परिसरात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने वीर सावरकरांचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या वतीने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी देखील टाळाटाळ करण्यात येत  होती. त्यानंतर एबीव्हीपी आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलत आंदोलन केल्यामुळे विद्यापीठाच्या वतीने पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली होती. अशा अनेक तक्रारींच्या मालिकेमुळे डॉ.सुभाष चौधरी अडचणीत सापडले आहेत. त्यात आता डॉ.सुभाष चौधरी यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या