नागपूर :नागपूर शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यातच सोमलवार निकालास आणि सोमलवार खामला या दोन प्रमुख शाळांच्या परिसरात 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शाळेत उपस्थित असलेल्या जवळपास 800 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीत अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि पालकांनी दोरीच्या सहाय्याने मानवी साखळी (Human Chain) तयार करत सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले.
Nagpur Human Chain Rescue Operation : मानवी साखळीच्या मदतीने बचावकार्य
मुसळधार पावसामुळे शाळेच्या मैदानात आणि मुख्य रस्त्यावर पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. पाण्याचा वेग जास्त असल्याने तिथे साधे उभे राहणेही कठीण झाले होते. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताच अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. शाळेच्या इमारतीपासून ते मुख्य रस्त्यापर्यंत दोरी बांधून पालकांनी आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार केली आणि पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हात धरून त्यांना सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर आणले. हे बचावकार्य सुरू असताना पालकांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि काळजी पाहायला मिळत होती.
Nagpur Administrative Failure : पावसाळ्यात रस्त्याचे काम; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोका
ऐन पावसाळा सुरू असताना प्रशासनाकडून शाळेसमोरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. रस्त्याचे बांधकाम अर्धवट असल्याने आणि तिथे मोठा खड्डा पडल्याने पावसाचे पाणी तुंबून ही भीषण परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि नियोजन शून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वेळेत योग्य नियोजन केले असते, तर विद्यार्थ्यांचा जीव अशा प्रकारे धोक्यात सापडला नसता, असा आरोप पालकांनी केला आहे.
Nagpur Student Safety Issue : 800 विद्यार्थी सुखरूप; पालकांचा सुटकेचा निश्वास
अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे 800 विद्यार्थ्यांना वेळेवर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. सर्व विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, परिसरात अद्याप पाणी साचलेले असल्याने प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे.
ही बातमी वाचा:
