Nagpur Accident News : नागपुरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कारच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. आज नागपूरमधील मनिषनगर इथं हा भीषण अपघात झाला आहे. ..
एका दुकानाच्या आवारात खेळत असताना तीन वर्षाचा चिमुरडा रस्त्यावर पोहोचला होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या कारने त्याला जोरदार धडक दिली. यामध्ये या तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. बेलतरोडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मनिषनगर येथील आश्रय सोसायटीत खेळत असताना हा चिमुकला मुलगा रस्त्यावर पोहोचला. तेव्हा कारने त्याला धडक दिली. अपघातानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मृत चिमुरड्याची ओळख तीन वर्षाचा श्रीअंश पंकज आष्टणकर अशी पटली आहे. माहितीनुसार, सोमवारी श्रीअंश आपल्या वडिलांसोबत दुकानावर गेला होता आणि दुकानासमोर खेळत होता. खेळता खेळता तो सिमेंट रोडवर पोहोचला. यादरम्यान एका कारने त्याला जोरदार धडक दिली. अपघातात श्रीअंश गंभीर जखमी झाला. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला तायवाडे रुग्णालयात नेले, तेथून डॉक्टरांनी त्याला मेडिकल रुग्णालयात पाठवले. मेडिकल रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चिमुरड्याला मृत घोषित केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि कार चालक हर्षद वहाणे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावर भीषण अपघात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हरदोली गावाजवळ कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार थेट कालव्यात जाऊन कोसळली आहे. या भीषण कार अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात लीलाबाई गौतम (वय ६६) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात विजय गौतम (वय 48), सरिता गौतम (वय 40, दोघेही रा. साखरीटोला) आणि यश लक्षणे (वय 25, रा. आमगाव) हे गंभीर जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ही गाडी नागपूर येथून साखरीटोला इथे येत असताना भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून वाहन पुलावरील कठडा ओलांडत थेट कालव्यात कोसळले. या अपघाताची नोंद सालेकसा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.