NEET Paper Leak: देशभरात गाजलेल्या नीट (NEET Exam) पेपर लीक आणि परीक्षेतील सावळागोंधळामुळे नागपुरात (Nagpur) राहणाऱ्या 18 वर्षीय आकांक्षा ऊर्फ स्नेहा चतुर्वेदी या विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण चतुर्वेदी कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. लेकीच्या विरहाच्या प्रचंड धक्क्याने तिच्या वडिलांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायूचा झटका आला असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Continues below advertisement

NEET Paper Leak: डॉक्टर बनवण्याचे स्वप्न अन् तणावातून टोकाचे पाऊल

मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मगनिया गावची रहिवासी असलेली आकांक्षा नागपूर येथे राहून नीट परीक्षेची तयारी करत होती. तिला या परीक्षेत 650 हून अधिक गुण मिळण्याची आशा होती. मात्र, NEET परीक्षेतील सावळागोंधळ, पेपर लीकच्या बातम्या आणि निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ती प्रचंड मानसिक तणावात गेली. अखेर "माझ्यात पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत उरलेली नाही," अशी हृदयद्रावक चिठ्ठी लिहून तिने आपले जीवन संपवले.

NEET Paper Leak: जमीन आणि दागिने विकून उभा केला होता शिक्षणाचा खर्च

आकांक्षाचे वडील कृष्ण कुमार चतुर्वेदी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपली शेतजमीन आणि घरातील दागिने विकले होते, तसेच कर्ज काढून लाखो रुपये उभे केले होते. अगदी नागपूरमध्ये तिच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी केटरिंगचे कामही केले. मात्र, एकुलत्या एक मुलीच्या अशा जाण्याने त्यांना इतका तीव्र मानसिक धक्का बसला की, त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि अर्धांगवायू झाला. सध्या ते बोलण्याच्या मनस्थितीत नसून त्यांना जागेवरून हलण्यासही त्रास होत आहे.

Continues below advertisement

NEET Paper Leak: दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी, आईचा आक्रोश

घरातील उरलीसुरली बचतही आता पतीच्या उपचारांवर खर्च होत असल्याचे सांगताना आकांक्षाची आई नीलम यांना अश्रू अनावर झाले. आपल्या वेदना मांडताना त्या म्हणाल्या, "धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा दिला असला तरी माझी मुलगी परत येणार नाही. पेपर लीक करणाऱ्या आणि या संपूर्ण गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्या दोषींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच माझ्या लेकीच्या आत्म्याला शांती मिळेल." दरम्यान, NEET च्या या गोंधळाने एका गुणवंत विद्यार्थ्याचा बळी तर घेतलाच, पण एका हसतं-खेळतं कुटुंबाचे आयुष्यही कायमचे उद्ध्वस्त केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Satara NEET exam death News: नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...