Nagpur Rains : पूर पाहण्यासाठी किंवा पुरातून गाडी काढू नका असं वारंवार सांगूनही काही जण नसतं धाडस करतात. असाच प्रकार नागपुरात समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत नाल्यात आलेल्या पुरात आठ जण वाहून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सतरापूर आणि नांदा गावादरम्यान वाहणाऱ्या नाल्यात आज दुपारी काही अंशी पूर आला होता. त्यामुळे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत होतं. त्यातच एका स्कॉर्पिओ चालकाने गाडीमध्ये आठ लोक बसलेले असतानाही पुलावरुन गाडी काढण्याचं धाडस केलं. मात्र तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याच्या धक्क्यामुळे स्कॉर्पिओ गाडी पुलावरुन नाल्याच्या प्रवाहात वाहत गेली.
सध्या पुलापासून काही अंतरावर स्कॉर्पिओ कार पाण्यात अडकलेली दिसत आहे. त्यामध्ये बसलेले प्रवासी वाहून गेले की अजूनही स्कॉर्पिओमध्ये आहेत हे स्पष्ट नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेत स्कॉर्पिओमध्ये बसलेले सर्व जण मृत्युमुखी पडले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्कॉर्पिओमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील पांढूर्णा या परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
विदर्भातील गडचिरोलीत पावसाचा हाहाकार
गडचिरोलीत पावसानं हाहाकार घातला आहे. जिल्ह्यातील आलापल्ली शहरात पूर आला आहे. त्यामुळे तेथील काही गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही गावातही पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान गडचिरोलीत एक महिन्याच्या बाळासह 70 पेक्षा जास्त नागरिकांना पूर परिस्थितीतून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्लीला लागून असलेल्या नागेपल्लीत पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तिथे अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. पोलीस प्रशासनाकडून पहाटे पाच वाजल्यापासून बचावकार्य सुरु आहे. यामध्ये एक महिन्यांच्या बाळासह अन्य 70 पेक्षा जास्त नागरिकांना रेस्क्यू बोटद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या