नागपूर : दोन दिवसापूर्वी नागपूरमध्ये आलेल्या पुराने शहराचे मोठे नुकसान झाले. एका पावसाने नागपुरात आलेल्या पुरामुळे (Nagpur Flood) मोठं नुकसान झाले असताना दुसरीकडे नागपूरकरांवर आणखी एका धोक्याची टांगती तलवार आहे. काही दशकांपूर्वी खडकवासला धरणाच्या दुर्घटनेमुळे जे पुणेकरांनी भोगले, तेच नागपूरकरांच्या नशिबी येऊ नये, अशी प्रार्थना केली जात आहे. नागपूरच्या मध्य वस्तीतील तब्ब्ल 28 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या आणि 8 टीमसी पाणी साठा असलेल्या अंबाझरी तलावाच्या संरक्षक भिंतीची दुरावस्था झाली आहे. 2018 पासून अंबाझरी तलावाच्या संरक्षण भिंती मजबूत करण्याच्या महापालिकेकडून केवळ घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणा हवेतच विरल्या असून अद्यापही प्रत्यक्ष काम झालेलं नाही.
कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप
महापालिकेने संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीच्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याची पडझड झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सांडव्याच्या भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी छिद्रे पडली आहेत. सांडव्याच्या पायथ्याशी असलेले जाड काँक्रीट अनेक ठिकाणी उखडून वाहून गेले आहे. त्यामुळे सांडव्यातून आणि त्याच्या खालून पाणी वाहतंय. तर तलावाला खेटूनच मेट्रोच्या निर्माण कार्याने ही अंबाझरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेली चार वर्षे अंबाझरीच्या बळकटीकरणासाठी महापालिका, नागपूर मेट्रो आणि राज्याचे जलसंपदा विभागात कागदी घोडे नाचवले जात आहेत आणि त्यामुळेच नागपूरकरांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
अंबाझरी तलावाच्या काँक्रीटच्या सांडव्यालगत सुमारे एक किलोमीटर लांबीच्या मातीच्या संरक्षक भिंत आहे. अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीच्या दोन्ही बाजूला पावसाच्या पाण्यामुळे खोलवर नाल्या निर्माण झाल्या आहेत. संरक्षण भिंतीच्या दोन्ही बाजूला मोठमोठाली झाड, झुडपे, वेली उगवलेल्या आहेत. मातीच्या संरक्षण भिंतीच्या दोन्ही बाजूच्या उतारावर अपेक्षित असलेलं दगडांचा पिचिंग कुठेच नाही आहे. त्यामुळे तब्ब्ल दीडशे वर्ष जुनं नागपुरचा वैभव असलेल्या अंबाझरी तलावाची धोक्यात असल्याचं जल अभ्यासकांना वाटतंय.
अंबाझरी तलावाचा इतिहास
> अंबाझरी तलाव गोंड राजांच्या काळात निर्माण झाले आणि नंतर भोसले राजांच्या काळात मोठे स्वरूप मिळाले.
> शहरातील अकरा तलावांपैकी अंबाझरी सर्वात मोठे...
> नागपूर ज्या नाग नदीमुळे ओळखला जातो. अंबाझरी तलाव त्याच नाग नदीवर बांधलेले आहे.
> अंबाझरी तलावाची साठवण क्षमता तब्ब्ल आठ टीएमसी एवढी आहे.
> अंबाझरी तलावाच्या पाठीमागे अनेक किलोमीटरपर्यंत त्याचा कॅचमेंट एरिया आहे.
> अनेक दशके अंबाझरी तलाव नागपूरकरांची तहान भागवत होता. नंतर मात्र पाणी प्रदूषित झाल्यामुळे आता त्याचा कुठलाही वापर होत नाही.
2017-18 च्या सुमारास अत्यंत जुन्या तलावाच्या सांडव्यामध्ये काही भेगा, छोटे छिद्र आणि भगदाड दिसू लागले. त्यामुळे अंबाझरी तलावाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली. त्यासंदर्भात न्यायालयात याचिका ही दाखल झाली. तेव्हा तलावाची मालकी असलेल्या महापालिका, जिल्हा प्रशासन, जवळून मेट्रोची एक लाईन जात असल्यामुळे मेट्रो प्रशासन आणि जलसंधारण विभाग यांच्या अनेक एकत्रित बैठका झाल्या. 7 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत अंबाझरी तलावाच्या मजबुतीकरणासाठी चार टप्प्यांमध्ये काम करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी 21 कोटी रुपयांच्या बजेटला प्रशासकीय मान्यता ही मिळाली. त्या अन्वये दोन कोटी 83 लाख रुपये खर्च करून स्टील चॅनेल म्हणजेच सांडव्याच्या मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांच्या उर्वरित कामांना महापालिका आणि इतर संबंधित विभाग विसरले. त्यामध्ये सांडव्यालालगत एक किलोमीटरच्या मातीच्या संरक्षण भिंतीचे मजबुतीकरण करणे, त्याच्या दोन्ही बाजूच्या उतारावर दगडाची पिचिंग करणे, मातीच्या संरक्षण भिंतीला रेलिंग लावणे, सांडव्याजवळ प्रेक्षक गॅलरीचे निर्माण करणे, मातीच्या संरक्षण भिंतीवर उगवलेले झाड कापणे असे अनेक काम करणे अपेक्षित होते.
नागपुरात जलप्रलय
अंबाझरी तलाव वर्षातील किमान आठ ते नऊ महिने काठोकाठ भरलेला असतो. त्यामुळे त्यात 8 टीएमसी पाणी असते. अंबाझरी तलाव आणि नागपूर शहरातील अंबाझरी लेआउट, वर्मा लेआउट, डागा लेआउट, समता कॉलोनी, शंकर नगर, कार्पोरेशन कॉलनी, धरमपेठ, सीताबर्डी यांच्या दरम्यान असलेली एक किलोमीटरची मातीची संरक्षण भिंत तुटली. तर नागपुरात कधी नव्हे असा जलप्रलय निर्माण होईल. अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गडकरींनी केल्या महत्त्वाच्या सूचना
अंबाझरी तलावाची सुरक्षितता धोक्यात आहे, हे महापूराच्या संध्याकाळी पाहणी करायला आलेल्या गडकरींच्याही लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लगेच उपस्थित अभियंतांना अनेक सूचना केल्या आणि लवकरच अंबाझरी तलावाच्या अवतीभवती सुरक्षेचे उपाय योजले जातील असे आश्वासन दिले होते.
लाखो पर्यटक देतात भेट
अंबाझरी तलाव नागपूर आतला प्रमुख पर्यटन स्थळ आहे.. रोज संध्याकाळी मोठ्या संख्येने नागपूरकर त्या ठिकाणी भेट देतात.. नागपूरच्या वैभवाची आणि हजारो नागपूरकरांच्या आवडीचं ठिकाण असलेलं अंबाझरी धोक्यात येणे लाखो नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे आहे.. त्यामुळे लवकरात लवकर अंबाझरी तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंतीच्या मजबुतीकरणासाठी उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.