नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव ( shyam manav ) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची आणि नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणे गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील तरूणाला अटक केल्यानंतर श्माम मानव यांच्या सुरक्षेत नागपूर पोलिसांनी वाढ केलीय. श्याम मानव यांना धमकी दिल्यानंतर बंदुकीसह पुण्यातील एक संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या तरूणाच्या अटकेनंतर नागपूर पोलिसांनी अधिक खबरदारी घेतली असून पुण्यात श्याम मानव यांचा मुलगा राहत असलेल्या ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली आहे.
श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांवर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केलाय. यातून दोघांनीही एकमेकांना आव्हानं देखील दिली आहेत. याच वादातून श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रमाणे गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गुरूवारी पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी श्याम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 21 आणि 22 जानेवारी रोजी व्हाट्सअॅपवर धमकीचे मेसेज आलेले आहेत. श्याम मानव यांच्या युट्युब चॅनेलच्या मॅनेजमेंटचं काम क्षितिज पाहतात. त्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर तिथे देण्यात आलेला आहे. त्याच नंबरच्या व्हाट्सअॅपवर शिवीगाळ करत घरावर बॉम्ब फेकण्याची आणि गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. क्षितिज हे पुण्यातील बावधन परिसरात राहायला आहेत. धमकीचे मेसेज आले तेंव्हा ते घरीच होते. त्यामुळे हा गुन्हा पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. मात्र या प्रकरणी पोलिसांनी कोणाला पकडलं आहे? त्याचा उद्दिष्ट काय? यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांनी आम्हाला दिली नाही. त्या संदर्भातली माहिती आम्हाला बातम्यांमधून कळली असल्याचे श्याम मानव यांनी म्हटले आहे.
"पुण्यातील एका व्यक्तीने मला गोळ्या घालून मारणार असल्याची धमकी देण्यात आली. या धमकीनंतर त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. ही घटना गंभीर असून असे घडेल याची कल्पना मला, पोलिस आणि सरकार सर्वांना आधीपासूनच आहे. यापूर्वी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि कर्नाटकातील गौरी लंकेश व कलबुर्गी अशी चार हत्या प्रकरणे घडली असल्याची आठवण श्याम मानव यांनी सांगितली. दरम्यान, यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. हिंदू धर्मात सुधारणा करणाऱ्यांनाचं ते टार्गेट करत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलाय.
"मला भीती वाटत नाही, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतर मी लगेच यामागे कोण आहे, हे कोणी केले आहे हे सर्व सांगितले होते. जे तरुण यामागे आहत ते सर्व ब्रेन वॉश केलेले तरुण असून यापूर्वीच्या चारही हत्या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासून माहिती होती. मात्र पुरावे मिळत नव्हते. दोन दिवसांपूर्वी पुण्यात पकडली गेलेली व्यक्ती कोण आहे यासंदर्भात फारशी माहिती नाही. तो त्याच संघटनांच्या वर्तुळातला आहे की बाहेरचा आहे हे अजून स्पष्ट नाही. मात्र, हे अतिशय नियोजित पद्धतीने रचलेला कट असून त्यांना महाराष्ट्रात कोणीही पुरोगामी विचाराचा नसावा असे वाटत आहे. त्यामुळे जी मुलं हिंदू धर्मावर प्रेम करतात त्यांचा ब्रेन वॉश केला जातो. त्यामुळे जे जे हिंदू धर्मात सुधारणांबद्दल काही करतात ते सर्व हिंदू धर्म विरोधी आहेत, ते सैतान आहेत असे त्यांच्या डोक्यात भरवले जाते. एका प्रकारे त्यांना प्रोग्राम केलं जातं. पुण्यात पकडला गेलेला माणूस त्याच यंत्रणेतून तयार झालेला आहे का? तो ब्रेनवॉश केलेला आहे का? त्याबद्दल पोलिस शोध घेतील आणि सत्य समोर आणतील. या सर्वा मागे सनातन प्रभात सारखे लोक असू शकतात, अशी शंका श्याम मानव यांनी व्यक्त केली आहे.
महतवाच्या बातम्या