नागपूर : क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झालेल्या नागपुरात तडीपार (हद्दपार) गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे आता तडीपार गुंड शहरातील चौका-चौकांवर झळकू लागले आहे
दादा, काका, मामा, भाई अशी भारदस्त नावे लावून शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने चौका-चौकात होर्डिंग लावून कुख्यात गुंड परिसरात आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आता अशाच गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी होर्डिंग वॉर सुरु केले आहे.
ज्या गुन्हेगारांना नागपूर शहरातून तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे, अशा गुन्हेगारांचे मोठे फलक शहरातील अनेक चौकात लावण्यास नागपूर पोलिसांनी सुरवात केली आहे. या फलकांवर तडीपार गुंडाच्या फोटोंसह त्यांच्या गुन्ह्यांची माहिती, त्यांच्या हद्दपारीचे ठिकाण आणि हद्दपारीचा कालावधी अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.
हद्दपारीच्या काळात जर संबंधित गुन्हेगार नागपूर शहरात दिसला तर फलकांवर दिलेल्या पोलिसांच्या फोन नंबरवर माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
नागपुरात हद्दपारीचा आदेश असतानाही अनेक गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असतात आणि रात्रीच्या वेळी अनेक गंभीर गुन्हे करतात. खंडणी, मारहाण, धमकी, खून किंवा खुनाचा प्रयत्न अशा अनेक घटनांमध्ये यापूर्वी तडीपार गुन्हेगार सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यावेळी थेट अशा हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची संपूर्ण कुंडलीच पोलिसांनी जनतेसमोर ठेवली आहे.
नागपूर पोलिसांनी या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला नागपूरच्या मानकापूर परिसरातून सुरुवात केली आहे. आज सकाळपासून या परिसरात गुन्हेगारांचे होर्डिंग लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नागपूर शहरातून आजच्या घडीला 600 ते 700 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यापैकी टॉप 50 गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचे जाहीर फलक संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावण्याचे कार्य सुरु झाले आहे.
ज्या फलकांचा व होर्डिंगचा वापर करून गुन्हेगार नागरिकांत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत होते, आता त्याच माध्यमाचा वापर करुन पोलीस नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, यामुळे तडीपार गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळवणे शक्य झाले आहे.
नागपूर पोलिसांनी लावले तडीपार गुंडांचे होर्डिंग्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2019 04:48 PM (IST)
क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झालेल्या नागपुरात तडीपार (हद्दपार) गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -