नागपूर: जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला (Pench Tiger Reserve) भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्याच्यासाठी आता विशेष राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय स्थानिक सल्लागार समितीने घेतला आहे. तशा सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari IAS) यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या आहेत. 


देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर शहराच्या (Nagpur City) परिघात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे त्याप्रमाणे अनेक व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve) देखील आहेत. वर्षाकाठी लाखो पर्यटक या व्याघ्र प्रकल्पांना भेट देत असून दिवसेंदिवस भेट देणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ताडोबा, मेळघाट, कान्हा इत्यादी सारख्या प्रख्यात व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी आता आपला मोर्चा इतर व्याघ्र प्रकल्पाकडे (Tiger Reserve) वळवला आहे. 


गतवर्षी एकट्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला (Pench Tiger Reserve) 85 हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. शिवाय यात विदेशी पर्यटकांची संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांच्या संख्येत अशीच सातत्याने वाढ व्हावी आणि व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी भेट देत पर्यटनांचा आनंद घेता यावा या उद्देशाने अनेक उपक्रम देखील आखले जातात.


पर्यटन सुविधा निर्माण करतांना स्थानिक जनतेच्या उपजिवीकेचा प्रश्न मिटणार


पेंच व्याघ्र प्रकल्पातील (Pench Tiger Reserve) जैवविविधता, वन्यजीवांच्या वाढीसाठी लागणारे पूरक आणि पोषक असे वातावरण यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा उंचावला आहे. त्यामुळेच देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल नुसार पेंच व्याघ्र प्रकल्पाला जाहीर झालेल्या यादीत 8 वे स्थान मिळाले आहे. तसेच सर्वोत्तम मूल्यांकन प्राप्त करून पेंच व्याघ्र प्रकल्पाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवाय 'द जंगल बुक' मधील मोगली या पात्रामुळे पेंच जंगल जागतिक पातळीवर नावारूपास आले आहे. निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच या प्रकल्पाच्या सभोवतालच्या क्षेत्रात पर्यटन सुविधा निर्माण करतांना स्थानिक जनतेच्या उपजिवीकेचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांकडून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे विक्री केंद्र प्रकल्पाच्या गेटवर सुरु करण्यासंदर्भात निर्णय यावेळी घेण्यात आला.


बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर निर्णय


विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त तथा स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ॲड. आशिष जयस्वाल, वनरक्षक तथा क्षेत्र संचालक, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रभू नाथ शुक्ल, तसेच समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.


पर्यटकांना विविध माध्यमांद्वारे मिळणार माहिती


पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसह इतर अनेक गोष्टींचा मनसोक्त आनंद घेता यावा या दृष्टीने अनेक उपक्रम सातत्याने  राबविण्यात येत असतात. त्याच अनुषंगाने अंबाखोरी येथे असलेल्या धबधब्यापर्यंत पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करताना बोटद्वारे पर्यटनाला चालना देणे, पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघासह इतर वन्य प्राण्यांच्या अधिवासासंदर्भात पर्यटकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देणे, तसेच पर्यटनासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्यावरही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच खुर्सापार गेटवरुन पर्यटनासाठी पसंती आहे, त्यामुळे पश्चिम पेंच व खुर्सापार गेट जोडण्याबाबत निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.


ही बातमी वाचा :