Nagpur News Update : नागपूर परिवहन विभागात बदली संदर्भात रॅकेट कार्यरत आहे का? आणि त्यामध्ये काही निवृत्त अधिकारी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे का? याचा तपास आता नागपूर पोलिसांची खास एसआयटी (विशेष तपास पथक) करणार आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात परिवहन विभागातील बदल्या संदर्भात दोन परिवहन निरीक्षकांच्या फोन कॉल संदर्भातली एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये खाडे नावाचे निवृत्त परिवहन अधिकारी नागपुरात आले असून त्यांनी नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील बदलीस पात्र असलेल्या सर्व परिवहन अधिकाऱ्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावल्याचं संभाषण होते. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून वायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यासंदर्भात एसआयटीची स्थापना केली आहे.
नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकात गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. एसआयटीने संबंधित पंचतारांकित हॉटेलमधील आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रत्येकी दहा तासांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्या फुटेजेमध्ये कोणकोणते परिवहन अधिकारी मध्यस्थाला भेटण्यासाठी या हॉटेलमध्ये आले होते, याची चौकशी केली जात आहे. नागपुरात मध्यस्थ म्हणून आलेले अधिकारी आणि त्यांना भेटायला आलेल्या परिवहन अधिकाऱ्यांचे भेटीचे उद्दिष्ट काय होते? खरंच हे प्रकरण पैसे घेऊन बदली करण्यासंदर्भातील आहे का? या संदर्भातील माहिती गोळा करून त्या सर्वांची चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूर शहरातील एका पॉश हॉटेलमध्ये थांबलेला एक व्यक्ती दलालांच्या माध्यमातून आरटीओतील बढती बदलीसाठी अनेकांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या रकमेची डील असल्याने ही चर्चा करणाऱ्यांनी शहानिशा चालविल्यामुळे संबंधित वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आहे. त्यातच आता ही या बदलीच्या रॅकेटमुळे आणखी भर पडली आहे. शिवाय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे बदलीसाठी असे एक रॅकेट कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून एसआयटीची स्थापना केल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
नागपुरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, देशभरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा म्होरक्या अटकेत