Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Vice Chancellor) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर विद्यापीठात एमकेसीएलमार्फत (MKCL) ऑनलाईन परीक्षा घेणे आणि निकाल लावण्याबद्दल केलेली नियुक्ती चौकशी समितीच्या अहवालात नियमबाह्य ठरल्याची माहिती आहे.. त्यामुळे एमकेसीएलचा अट्टाहास धरणाऱ्या कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Subhash Chaudhary) यांच्या संदर्भात नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे.
विद्यापीठाचे काम उत्तम शिक्षण देणे, योग्यरीतीने परीक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी मदत करणे हे आहे. दुर्दैवाने नागपूर विद्यापीठात तसं काही ही होताना दिसत नाही असा आरोप आमदार दटके यांनी केला आहे. सध्या, नागपूर विद्यापीठात परीक्षेनंतरही अनेक महिने निकाल लागत नाही. त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी एमकेसीएल हीच एकमेव कंपनी आहे का, कुलगुरू यांनी एमकेसीएल या एकमेव कंपनीचा अट्टाहास का धरला असा सवाल ही प्रवीण दटके यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर विद्यापीठात परीक्षा घेणे, निकाल लावणे या प्रक्रियेसाठी एमकेसीएल या कंपनीची निविदा मंजूर झाल्यानंतर संपूर्ण निविदा प्रक्रिये संदर्भात आरोप झाले होते. त्यानंतर उच्च तंत्रशिक्षण विभागाने बाविस्कर समितीची नेमणूक केली होती. आता याच बाविस्कर समितीने चौकशी पूर्ण करून आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सोपवला आहे.
बाविस्कर समितीच्या चौकशी अहवालात याच एमकेसीएल या कंपनीला निविदा देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा ठपका विद्यापीठ प्रशासनावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजपने कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कुलगुरुंवर कारवाई करण्याची मागणी करण्या आली आहे. विद्यापीठासारख्या पवित्र ठिकाणी कायदेशीर पद्धतीनेच निविदा काढल्या पाहिजे. मात्र, नागपूर तसं झालेलं नाही. नागपूर विद्यापीठात नियमांचा उल्लंघन करून निविदा दिल्याचे फक्त एमकेसीएलचेच प्रकरण नाही. तर, इतर अनेक निविदांमध्येही अशाच पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेगवेगळे विभाग त्याची चौकशी करत आहे. त्यामुळे त्या सर्व प्रकरणांमध्ये ही योग्य चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी अपेक्षा प्रवीण दटके यांनी व्यक्त केली आहे.