Nagpur News : नागपुरातील काही क्रिकेट बुकी आणि गुन्हेगार वृत्तीचे सट्टेबाज नागपूर पोलिसांना (Nagpur Police) जुमानत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत पार्टीवर छापा टाकल्याच्या कारवाईला दोन दिवस होत नाहीत तोच नागपुरातील क्रिकेट बुकींनी पाटणसावंगी परिसरात पुन्हा तशीच पार्टी (Party) आयोजित केली. विशेष म्हणजे पाटणसावंगीजवळ पार पडलेल्या या पार्टीमध्ये अनेक डान्सर्सनाही बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे बुकी पोलिसांना घाबरत नाही का, कायद्याला जुमानत नाही का असे प्रश्न निर्माण झाले आहेत.


दोन दिवसांपूर्वी पार्टीवर छापा, एक कोटींच्या मुद्देमालासह 28 जण अटकेत


कळमना पोलीस स्टेशनअंतर्गत शनिवारी रात्री उशिरा (रविवारच्या पहाटे) सुरु असलेल्या एका अनधिकृत पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. क्रिकेट बुकी आशिष कुकडे उर्फ बोमा याने आयोजित केलेल्या या ओल्या पार्टीत अनेक नियमबाह्य गोष्टी सुरु असताना पोलिसांचा छापा पडला होता. त्यावेळी पोलिसांनी एक कोटी रुपयांच्या मुद्देमालासह 28 जणांना अटक देखील केली होती. मात्र पोलिसांच्या या कारवाईचा निगरगट्ट बुकींवर काहीही परिणाम झाला नाही. उलट कारवाईच्या दोन दिवसानंतर नागपूर येथील क्रिकेट बुकीनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाटणसावंगी परिसरात पुन्हा तशीच पार्टी आयोजित केली.


कारवाईनंतर दोनच दिवसांनी पुन्हा पार्टी


यावेळी ग्रामीण भागात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. आधीच्या पार्टीपेक्षा ही पार्टी जास्त मोठी आणि आलिशान होती.  महत्त्वाचं म्हणजे यावेळी बुकीने उत्पादन शुल्क विभागाकडून रीतसर परवाना घेऊन दारुची पार्टी केली. या पार्टीत रशियन डान्सर्सनाही बोलावण्यात आलं होतं. पार्टीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच उपस्थितांचा गोंधळ उडाला. पण कोणतीही कारवाई न करता पोलीस परतले.  पण त्यानंतर पोलिसांच्या बाबतीत उलट चर्चा सुरु झाली.


खासगी कंपनीच्या पार्टीत अश्लील नृत्य, नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमधला प्रकार


नागपूरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील नृत्य (Obscene Dance) केल्याचा प्रकार समोर आला होता. सौरऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या एका कंपनीने पार्टीचे (Party) आयोजन केले होते. त्या पार्टीमध्ये हा धक्कदायक प्रकार घडला आहे. पार्टी दरम्यान तिथे उपस्थित कर्मचारी अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करत होते. या पार्टीतील हे व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर हॉटेल व्यवस्थापक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा


व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमच्या माध्यमातून 58 कोटींचा गंडा; आरोपीच्या घरातून 18 कोटींची रोकड, 15 किलो सोनं जप्त