Nagpur News : नागपूरच्या (Nagpur) पारशिवनी (Parshivani) पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानिक छोटा गोवा नामक तलावात राम नवमीच्या (Ram Navami 2023) दिवशी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना गुरुवारी (30 मार्च) घडली आहे. भवानी नेमीचंद जांगीड (वय 22 वर्षे) आणि पंकज ईश्वरचंद जांगीड (दोघेही रा.चंदन नगर, महेश कॉलनी व हनुमान नगर नागपूर) अशी मृतांची नावं आहेत.


बोटीत पाणी शिरलं, पोहता येत नसल्याने तरुणांचा बुडून मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, पारशिवनी येथील छोटा गोवा समजण्यात येणाऱ्या तलावावर दोन्ही तरुण हे दुचाकीने (क्रमांक एम.एच.31 बीएन 5097)  फिरायला गेले होते. तेव्हा तलावात कोणीही नाही हे पाहून तलावाजवळ गेले आणि तलावाकाठी असलेली तुटलेली लाकडी बोट घेऊन ते तलावातील पाण्यात शिरले. पाण्यात काही अंतरावर गेले असताच बोटीमध्ये पाणी शिरायला लागले. त्यामुळे बोट पाण्यात बुडू लागली. पोहता येत नसल्याने दोन्ही तरुणांचा बुडून मृत्यू झाला.


मच्छिमारांना तरुणांचे कपडे, बूट, मोबाईल तलावाच्या काठावर सापडले


मच्छिमार जेव्हा सायंकाळी पाच वाजता तलावाची पाहणी करण्यासाठी गेले असता दोघांचे कपडे, बूट आणि मोबाईल फोन बाहेर काठावर दिसले.  एकाचे डोकं पाण्यात तरंगत असताना दिसले. त्यामुळे कोणीतरी बुडले असल्याचा अंदाज येताच, याबाबत पारशिवनी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आलं. ते तरुण मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनीच्या ग्रामीण रुग्णालय इथे दाखल करण्यात आले.


चंद्रपुरात तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू


चंद्रपूरमध्ये (Chandrapur) दोन महिन्यांपूर्वी पोहायला (Swimming) गेलेली तीन मुलं तलावात बुडल्याची घटना घडली होती. कोरपना तालुक्यातील आवारपूर इथल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात (UltraTech Cement Limited) 26 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. तिन्ही मुलं दहा वर्षांची असून एकाच वर्गात शिकत होती. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आले. त्यामुळे त्यांचा तलावात शोध घेण्यात आला. परंतु रात्री शोध न लागल्यामुळे सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली. तेव्हा त्यांचे मृतदेह सापडले.