Nagpur : वाढत्या शहरीकरणामुळे सीवर मॅनहोल्सच्या (Manhole Cleaning) स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा झाला आहे. मोठ्या मशिन्समुळे रुंद रस्त्यावर सीवेज चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते, पण अरुंद रस्त्यावर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत घेत आहे.


शहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना सीवरलाईनच्या मॅनहोलमध्ये प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे, या प्रमुख उद्देशपूर्तीसाठी नागपूर स्मार्ट सिटीने (Nagpur Smart City) तीन स्वच्छता रोबोट भाडेतत्वावर घेतले आहेत. या रोबोटद्वारे मागील 14 दिवसात शहरातील तीन झोन अंतर्गत येणाऱ्या 390 मॅनहोल्सची स्वच्छ करण्यात आले आहेत. 


'मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग' कायदा 2013 नुसार 'मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग'वर बंदी घालण्यात आली आहे. यावर तोडगाम्हणून नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने अत्याधुनिक रोबोट मशीन भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. याकरता नियमानुसार निविदा काढून सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुढील 5 वर्षांसाठी हे तीन मॅनहोल्स स्वच्छता रोबोट जेनोरोबोटिक्स कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आले आहेत.


अत्याधुनिक रोबोटचा वापर करण्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ, शहरातील विविध भागांमध्ये ये-जा करण्यासाठी लागणारे वाहन व खर्च, रोबोटची देखभाल दुरुस्थी आणि इतर सर्व खर्च मिळून या तिन्ही रोबोटचे भाडे 7 लाख 47 हजार दरमहा असणार असले, तरी कामानुसार लक्ष्यापूर्तनुसार (deferred payment mode) भाडे दिले जाणार आहेत. या रोबोटची किंमत GeM पोर्टलवर 39 लाख 52 हजार इतकी आहे. केवळ रोबोट घेऊन काही साध्य होणार नव्हते, त्याद्वारे उत्तम काम व्हावं, मशिनची उत्तम देखरेख व ती योग्य कार्यान्वित व्हावी या रोबोट्सला घेण्यामागील उद्देश आहे. प्रत्येक रोबोट मागे चार लोकांचा टीम असून त्यात एक ऑपरेटर, एक सुपरवाझकर आणि दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांचा खर्च कंत्रादारांकडून केला जात आहे.


प्रत्येक 'रोबोट'ला 250 मॅनहोल्स स्वच्छ करण्याचे लक्ष्य


प्रत्येक रोबोटला शहरातील 250 मॅनहोल्सची स्वच्छता करण्याचे लक्ष्य देण्यात आले असून लक्ष्यपूर्ती झाल्यास पूर्ण भाडे दिले जाणार आहे. शिवाय 250 पेक्षा कमी मॅनहोल्सची स्वच्छता केल्यानंतर सदर कंपनीला 75 टक्के रक्कम आणि 200 पेक्षा कमी मॅनहोल्सची स्वच्छता केल्यास त्यांना 50 टक्के रक्कम देण्याचे ठरले आहे. तिन्ही रोबोटला शहारातील एकूण 750 मॅनहोल्सची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मनपा अधिकाऱ्यांनी सुनिश्चित केल्यावरच सदर कंपनीला पैसे दिले जातात. यामुळे शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छतेला गती मिळाली आहे. करारानुसार पाच वर्षांनंतर हे रोबोट स्मार्ट सिटीच्या मालकीचे होणार आहेत. या रोबोटद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या सतरांजीपूरा, लकडगंज आणि गांधीबाग या झोन मध्ये गत 14 दिवसात 390 मॅनहोल्सची स्वच्छता  करण्यात आली आहे. रोबोटद्वारे केल्या जाणाऱ्या स्वच्छतेची माहिती ही जीपीएस प्रणालीद्वारे मिळते. रोबोटच्या कार्यक्षमतेमुळे सदर रोबोटची मागणी इतर झोन मध्येही अधिक प्रमाणात केल्या जात असून, प्रत्येक झोन मध्ये या रोबोटद्वारे स्वच्छता केल्या जाणार आहे. अशी माहिती स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागाच्या प्रभारी महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी दिली.


ही बातमी देखील वाचा


Nagpur Central Jail : मध्यवर्ती कारागृहात तस्करीचे रॅकेट; पोलीस शिपायाची मदत, सात जणांविरोधात गुन्हे