Nagpur News : नागपूर (Nagpur) भाजपतर्फे (BJP) महिला बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करीत मृताच्या कुटुंबाला 25 लाख आणि जखमींना प्रत्येकी दहा लाखांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कामगारांच्या हक्काच्या शासकीय पैशांनी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना भांडी वाटप करून प्रसिध्दी मिळवण्याच्या नादात भाजप निष्पाप लोकांचा जीव घेणार का? याला जबाबदार कोण? तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार का, की फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद म्हणून फाईल बंद करणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
मृत्यूला जबाबदार कोण?
नागपूर शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात भाजपतर्फे आयोजित किचन किट वाटप शिबीरात शनिवारी एकच गोंधळ झाल्याचे समोर आले. या शिबीराला महिलांची प्रचंड गर्दी उसळल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली असून यात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर अनेक महिला यात जखमी झाल्या. यावरून आता विरोधकांनी भाजपला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. मागील वर्षी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात निष्पाप लोकांचा जीव गेला होता. त्या दुर्घटनेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. त्यानंतर नागपूरात पुन्हा तशीच घटना घडली आहे. त्यामुळे भाजपने हा सर्व दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून पक्षाकडून मदत द्यावी, तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विरोधकांची डागले भाजपवर टीकास्त्र
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी देखील भाजपवर टीका करत आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी मार्केटिंगसाठी निःष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या भाजपवर कारवाईची मागणी केली आहे. चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे बंटी शेळके यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविण्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी प्रकरणावरुन शहराचे राजकारण देखील तापल्याचे बघायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या