नागपूर : सामाजिक स्थितीचं भान, संवेदनशीलता आणि माणूस म्हणून इतर माणसांप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव असली की माणूस व्रतस्थ होतो. नागपुरात एका अल्पशिक्षित ऑटो चालकाने असेच सामाजिक व्रत खांद्यावर घेतलंय. आनंद वर्देवार नावाच्या या ऑटो चालकाने त्याची ऑटो एम्ब्युलेन्समध्ये परावर्तित करून कोरोना संपेपर्यंत फक्त रुग्णांच्या सेवेत ऑटो चालवण्याचा निर्धार केला आहे.
कोरोनाकाळात एक दमडी ही कोणाकडून कमावणार नाही, असा निर्धारही आनंदने केला असून आता ते दिवसभर कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात नेण्यात व्यस्त आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आनंद यांच्या ऑटोत दोन कोरोना बाधित रुग्णांनी ऑक्सिजन अभावी प्राण सोडले होते. तीच घटना आनंद यांना हादरवून गेली आणि आनंद यांनी कोरोना संपेपर्यंत आपल्या ऑटोमध्ये ऑक्सिजनची सोय करून फक्त आणि फक्त रुग्णसेवेचं व्रत स्वीकारलं आहे.
आनंद उर्फ राहुल वर्देवार हे गेले 20 वर्ष ऑटोचालक असून दिवसभर मेहनत करुनही मोठ्या अडचणीने पत्नी, दोन मुलं आणि वृद्ध आईचा उदरनिर्वाह करतात. गेले वर्षभर वारंवार लॉकडाऊन लागत असल्यामुळे आनंदच्या अल्प कमाईवरही बाधा आली आहे. मात्र, अशा अडचणीच्या काळातही आनंदसोबत एक अशी घटना घडली की त्याने कोरोना संपेपर्यंत त्याची ऑटो फक्त आणि फक्त रुग्णांसाठी आणि ती ही निशुल्क चालवण्याचा निर्धार केला आहे.
काही दिवसांपूर्वी आनंद याच्या ऑटोत पारडी परिसरातून एक रुग्ण बसला होता. त्याला रुग्णालयात दाखल करायचे होते. आनंद त्याला घेऊन अनेक रुग्णालयात फिरले. मात्र त्याला बेड आणि ऑक्सिजन मिळू शकले नाही. काही तासांनी त्या रुग्णाने ऑटोतच प्राण सोडले. काही दिवसांनी पुन्हा एका दुसऱ्या रुग्णाबद्दलही तसेच घडले. हळव्या मनाच्या आनंदवर या दोन घटनांचा मोठा परिणाम झाला. नेमकं त्याच काळात कोरोनाने आनंद यांच्या कुटुंबालाही घेरले. सुदैवाने आनंद यांची कोरोना बाधित मुलगी आणि आई घरीच औषधोपचाराने बरी झाली. त्याचवेळी आनंदने आपल्याकडील तुटपुंज्या ठेवीतून आणि मित्रांच्या मदतीतून ऑटोत ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्याचे ठरविले. पाहता पाहता ऑटोत ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिमीटर, सॅनिटायजर, पीपीई किट, काही आवश्यक औषधीची सोय झाली आणि कोरोना संपेपर्यंत ऑटो फक्त आणि फक्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी चालवण्याचा निर्धार केला आहे.
आनंदच्या पत्नी पुष्पलता एका खाजगी रुग्णालयात लॅब टेक्निशियन आहे. पतीने ऑटोत ऑक्सिजनची सोय करत त्यास रुग्णवाहिकेचं स्वरूप दिल्यानंतर पुष्पलताने ती काम करत असलेल्या रुग्णालयातून आनंदला रुग्णाला ऑक्सिजन कसा लावायचा, तो किती प्रमाणात लावायचा यासंदर्भात आवश्यक प्रशिक्षण मिळवून दिलं. आता कोरोना संपेपर्यंत नवरा फक्त रुग्ण सेवा करणार, घर चालव्यासाठी तो हातभार लावू शकणार नाही ही माहिती असूनही पुष्पलता यांनी आनंदला मी कुटुंब चालवते, तुम्ही सामाजिक कर्तव्य पूर्ण करा असं सांगत पाठिंबा दिला आहे.