नागपूर : नागपुरात (Nagpur News) सीएनजीच्या (CNG Price) दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. नागपुरात सीएनजीचे जर 10 रुपयांनी कमी झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलास मिळाला आहे. एका वर्षांत नागपुरात सीएनजी 26 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये नागपुरात सीएनजी 116 रुपये प्रति किलो होता. तोच दर आता  89 रुपये 90  पैशांवर आला आहे. 


15 ऑगस्ट च्या रात्रीपासून नागपुरात सीएनजीचे दर प्रति किलोमागे दहा रुपयांनी कमी झाल्यामुळे सध्या 89 रुपये 90 पैसे एवढा सीएनजीचा प्रति किलोचा दर झाला आहे. 15 ऑगस्ट पर्यंत सीएनजी सदर 99 रुपये 90 पैसे प्रति किलो एवढा होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत सीएनजीचा दर 120 रुपये प्रति किलो एवढा होता.. तेव्हा संपूर्ण देशात सीएनजी नागपुरात सर्वात महाग होती. त्यानंतर दरात काहीशी घसरण होऊन आधी 116 रुपये प्रति किलो आणि नंतर 106 रुपये प्रति किलो अशी टप्प्याटप्प्याने सीएनजीच्या दरात घसरण झाली होती.


 नागपुरात मोठ्या संख्येने ऑटो सीएनजी वर चालतात त्यामुळे ऑटो चालकांना या दर घसरणीमुळे मोठा फायदा होत आहे.अनेक कारचालकांनीही सीएनजीच्या दरात घसरण होत असल्यामुळे दिलासा मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान सीएनजीच्या दरात मोठी घसरण होत असली तरी पेट्रोल आणि डिझेल च्या दरात घसरण केव्हा होईल असा सर्वसामान्यांचा प्रश्न कायम आहे.


CNG म्हणजे काय?


सीएनजीचे पूर्ण नाव "कंप्रेस्ड नॅचरल गॅस" आहे. हा देखील नैसर्गिक वायू आहे, परंतु तो उच्च दाबाने (200 बार पर्यंत) कम्प्रेस्ड केला जाते. सीएनजीचा वापर वाहनांसाठी केला जातो. वाहनांमध्ये इंधनाऐवजी सीएनजी वापरला जातो. सिलेंडरमध्ये अधिकाधिक वायू साठवून त्याचा दीर्घ कालावधीसाठी वापर करणे हा गॅस कम्प्रेस करण्याचा मुख्य उद्देश आहे.