Nagpur News : नागपूरच्या (Nagpur) उड्डाणपुलांवर (Flyover) गेल्या महिन्याभरात दोन अपघात होऊन पाच जणांचा उड्डाणपुलावरुन खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उड्डाणपुलांवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून कुठलेही उपाय योजण्यात आलेले नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला उड्डाणपुलावर धोकादायक पद्धतीने बॅनरबाजी करुन राजकारणी हजारो दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे. नागपूर-वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विभागाने केलेली बॅनरबाजी दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी ठरु शकते.


नारायण राणे काल (2 ऑक्टोबर) नागपूर आणि वर्धाच्या दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने नारायण राणे ज्या रस्त्यावरून वर्ध्याला गेले त्या रस्त्यावर त्यांच्या विभागाने नारायण राणे यांच्या कार्यक्रमाची माहिती देणारे शेकडो बॅनर्स लावले. मात्र डबल डेकर उड्डाणपुलाच्या विजेच्या खांबावर हे बॅनर्स अत्यंत धोकादायक पद्धतीने लावण्यात आले होते. लोखंडी फ्रेम असलेले हे बॅनर्स उड्डाणपुलावर आतील बाजूस झुकल्यामुळे ते दुचाकीस्वरांसाठी धोकादायक बनले आहेत. डबल डेकर उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना लोखंडी फ्रेम्सच्या या बॅनर्समुळे इजा होण्याची शक्यता आहे. तर अनेक दुचाकीस्वार वाहतुकीच्या दिशेने लटकलेल्या लोखंडी फ्रेमच्या या बॅनर्समुळे पडता पडता वाचलेही आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या विभागाने केलेल्या या बॅनरबाजीकडे तातडीने लक्ष घालून धोकादायक आणि लोखंडी फ्रेमचे बॅनर काढण्याची गरज आहे.


उड्डाणपुलावरुन कोसळून आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू
नागपूरचे उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. कारण नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या उड्डाणपुलांवर एका आठवड्यात झालेल्या दोन घटनांमध्ये उड्डाणपुलांवरुन खाली कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरच्या अमर शहीद गोवारी उड्डाणपुलाच्या काँक्रिटच्या संरक्षण भिंतीवरुन खाली कोसळून अनिता दिलपे या 30 वर्षीय महिलेचा 17 सप्टेंबरच्या रात्री अपघाती मृत्यू झाला होता. 


त्याआधी  9 सप्टेंबरच्या रात्री सक्करदरा परिसरातील उड्डाणपुलावर अशीच घटना घडली होती. मद्यपी चालकाने बेदरकारपणे कार चालवून समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली. या धडकेमुळे कार सक्करदरा उड्डाणपुलाच्या काँक्रिटच्या संरक्षण भिंतीला ओलांडून सुमारे 70 फूट खाली कोसळली. ज्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. विनोद खापेकर, वेदांत खापेकर, विवान खापेकर आणि लक्ष्मी खापेकर अशी मृतांची नावं आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या