Nagpur Ash Water Issue : नागपूरमधील (Nagpur) कोराडी (Koradi Power Plant) आणि खापरखेडा (Khaparkheda Power Plant) या दोन्ही वीज केंद्रातून झालेल्या राखेच्या गळतीचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये भयावह परिणाम समोर येऊ शकतात, असं अभ्यासकांना वाटत आहे. कोराडी आणि खापरखेडा परिसरात औष्णिक वीज केंद्राचे स्थानिकांच्या जीवनावरील परिणामांचा अभ्यास करणाऱ्या "सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट" या संस्थेच्या अभ्यासकांनी त्या परिसरात यापूर्वी घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये अनेक घातक हेवी मेटल्स (भारी धातू) आढळल्याचा दावा केला आहे. जर आधीच्या राख गळतीच्या छोट्या प्रकरणांमुळे पाण्यामध्ये घातक हेवी मेटल्स मोठ्या प्रमाणावर आढळले असतील तर आता राखेच्या या प्रचंड मोठ्या गळतीनंतर भविष्यात नागपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय घडू शकेल अशी भीती निर्माण झाली आहे.
कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बांध म्हणजेच Ash Bund 16 जुलै रोजी फुटला. त्यानंतर 24 जुलै रोजी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून राखेचे वहन करणाऱ्या पाईपलाईनमध्ये गळती झाली. दोन्ही घटनांमुळे परिसरात थोडे थोडके नव्हे तर लाखो लिटर राखमिश्रित पाणी पसरले. राखेच्या चिखलामुळे शेतीचे भूमिगत जलसाठ्याचे तसेच परिसरातून वाहणाऱ्या नदी नाल्यांचे प्रदूषण होऊन पर्यावरणीय नुकसान झाले. मात्र, याच परिसरात गेले अडीच वर्षांपासून औष्णिक वीज केंद्राच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या "सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थे"तील अभ्यासकांच्या मते राख गळतीचे दृश्य परिणामापेक्षा आरोग्यावरील अदृश्य परिणाम जास्त भयावह राहतील. सीएसडीने याच परिसरात पूर्वी ही राखेचे परीक्षण केले असून पाण्याचे नमुनेही घेतलेले होते. तेव्हा त्यांना पाण्यात अनेक हेवी मेटल्स (भारी धातू) आढळले होते. त्यामध्ये अल्युमिनियम, अँटीमनी, कॅडमियम, बोरॉन, आर्सेनिक, लिथिनियम, सिलिनियम, वेनेडियम आणि मर्क्युरीसारख्या धातूंचा समावेश होता. सीएसडीच्या लीना बुद्धे यांच्या मते तिथल्या पाण्यात अनेक घातक मेटल्सचे प्रमाण खूप जास्त आढळले होते.
अभ्यासकांचा दावा आहे की आरोग्यावर या मेटलचा अत्यंत विपरीत परिणाम होतो. मात्र आरोग्यावरील विपरीत परिणाम दृश्य स्वरुपात समोर येण्यामध्ये अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. कारण काही मेटल्स शरीरामध्ये बायो मॅग्निफाय होतात. त्यामुळे अनेक वेळेला लोकांना त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम राखेमुळेच आहे हे कळत सुद्धा नाही. सीएसडीचा दावा आहे की कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्राच्या मध्ये वसलेल्या सुरादेवी गावामध्ये जवळपास 80 टक्के लोक किडनी स्टोनचे रुग्ण आहेत. तर पोटाचनकापूर गावामध्ये प्रदूषित पाण्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडचे प्रकरण खूप जास्त आहे. खैरी गावामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे लोकांच्या त्वचेवर दुष्परिणाम झाल्याचे यापूर्वी समोर आले आहे. दोन्ही वीज प्रकल्पाच्या पंचक्रोशीत अनेक गावांमध्ये बोन डेन्सिटीचे प्रकरणही समोर आल्याचा सीएसडीचा दावा आहे.
कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात आतापर्यंत छोट्या प्रमाणावर राखेची गळती होत होती. तरी लोकांच्या आरोग्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत असतील तर आता एकाच दमात एवढ्या मोठ्या प्रमाणावर राख फक्त जमिनीवरच नाही तर भूजलात आणि नद्यांमध्ये पसरल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचे अत्यंत भयावह परिणाम समोर येतील अशी भीती अभ्यासकांना वाटत आहे. तसेच परिसरातून वाहणाऱ्या कोलार आणि कन्हान नदीतून नागपूरकरांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. या दोन्ही नद्या राखेच्या गळतीच्या दुर्घटनांमुळे प्रदूषित झाल्यामुळे नागपूर महापालिकेने आणि महापालिकेसाठी पिण्याचा पाणी पुरवणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीने त्यांच्या जलशुद्धीकरण केंद्राची तपासणी करणे. तसेच त्यांचे जलशुद्धीकरण केंद्र खरोखरच या हेवी मेटल्सला पाण्यातून वेगळे करण्याची क्षमता ठेवते का याची तपासणी करण्याची गरज असल्याचेही या अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच महापालिकेने प्राधान्याने नागपूरकरांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये हेवी मेटल्सचं अॅनालिसिस करण्याची आवश्यकता असल्याचेही सेंटर फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंटचे म्हणणे आहे.
दरम्यान, दोन्ही वीज केंद्रांच्या पंचक्रोशीत वसलेल्या गावांसाठी शासनाने तसेच महानिर्मितीने सर्व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही सीएसडीने केली आहे.