Nagpur News : नागपूर (Nagpur) शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना (Nagpur Police) आता कुख्यात गुन्हेगारांबरोबर शहरातील भटक्या श्वानांवर (Stray Dogs) नजर ठेवून त्यांची गणना करावी लागणार आहे. त्यासंदर्भात डेटा गोळा करावा लागणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 44 अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूरच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनसाठी असे परिपत्रक जारी केले आहे. 


त्यानुसार पोलीस स्टेशन परिसरात किती मोकाट कुत्रे आहेत, याबाबत शहानिशा करुन त्याबद्दलची माहिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित मॉनिटरिंग कमिटीला सूचित करावे, अशा सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.


याशिवाय पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या तीन वर्षात किती मोकाट कुत्र्यांनी लोकांना चावे घेतले आहेत, याबाबतच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याचे संकलनही पोलीस स्टेशनला करावे लागणार आहे. तसेच सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक भटक्या कुत्र्यांना नियमितपणे रस्त्यावरील एका ठिकाणी अन्न टाकतात का यावर लक्ष देण्याच्या सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.


भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवरील दंडाचा निर्णय रद्द
नागपूर शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महापालिकेचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरवत तो कायम ठेवला होता. परंतु हायकोर्टाचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला. आदेश रद्द करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने म्हटलं की, लोकांना उपद्रव न होता भटक्या कुत्र्यांना खायला देण्यास परवानगी आहे. भटक्या जनावरांना खायला घातलं म्हणून दंड करण्यासारखं कोणतंही जबरदस्तीचं पाऊल उचललं जाऊ शकत नाही.


नागपूरमध्ये डिसेंबरपासून कुत्र्यांच्या नसबंदीला सुरुवात होणार!
नागपूरमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नसबंदी आणि अॅन्टी रेबीज वॅक्सिन लावण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) ला सुरुवात होणार आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मनपाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर हायकोर्टाने मनपाला फटकारले होते. ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना संक्रमणामुळे नसबंदीची प्रक्रिया पूर्णतः थांबली होती. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली होती.