Nagpur News : शाळेच्या अवतीभवती वातावरण चांगले नाही, पायाभूत सुविधा नाही, शाळेला जायला रस्ता नाही, अशा कारणावरुन शाळा स्थलांतरित करा अशा मागण्या आपण ऐकत असतो. मात्र, नागपूर (Nagpur) जिल्ह्यात शाळा (School) स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी वाघ (Tiger) कारणीभूत ठरला आहे. नागपूर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पांजरी लोधी' गावातील शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा, अशी मागणी शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे केली आहे.


शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यात सातत्याने एका वाघिणीचा वावर आहे. बछड्यांसह फिरणाऱ्या या वाघिणीने परिसरात गुरांची शिकारही केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. 


शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांची पायपीट 
पांजरी लोधी गावाची शाळा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडी झुडपे आहेत. शाळेचे अगदी मागेच टेकडी असून तिथे मोठे जंगल आहे. पांजरी लोधी, सुकडी, खातमारी आणि नवरमारी या सर्व गावातून शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन ते चार किलोमीटर पायी चालावे लागते. अशा परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडू नये या अनुषंगाने शाळा स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. 


वर्ग अपुरे असल्याने विद्यार्थ्यांवर शाळेच्या आवारात बसण्याची वेळ
पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत असलेल्या या शाळेत वर्ग अपुरे असल्यामुळे अनेक वेळेला विद्यार्थ्यांना शाळेचे आवारात बाहेर बसवावे लागते. त्यामुळे परिसरात वाघाचा वावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोक्याची बाब आहे. त्यामुळे शाळा गावाजवळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.


यवतमाळमध्ये नरभक्षक वाघाची दहशत
दुसरीकडे विदर्भातील यवतमाळच्या वणी तालुक्यात दोन वर्षांपासून नरभक्षक वाघाची दहशत आहे. त्याच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. जखमी इसमावर दवाखान्यात उपचार सुरु असून सद्यस्थितीत या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टीकाराम कोगंरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या वाघाचा बंदोबस करावा अशी मागणी केली आहे. गावकऱ्यांमध्ये या वाघाची दहशत पसरलेली असल्याने शेतात काम करण्याकरता शेतकरी तसंच शेतमजूर सुद्धा जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक पाठवून नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, जेणेकरुन या परिसरातील जनजीवन सुरळीत होईल, अशी मागणी करण्यात आली.