Nagpur News Update : हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही जरी शेकोटी पेटवत असाल, तर ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. कारण नागपुरात (Nagpur) संध्याकाळच्या थंडीत शेक घेण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीने भाजल्यामुळे एका 68 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेला महिलेचे नाव असून त्या मेहेरबाबा नगरात राहत होत्या.


मिळालेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी वृद्धेने शेकोटी पेटवली. त्याच्या समोर बसले असताना लीलाबाईच्या कपड्यांनी पेट घेतला. हे सर्व अचानक घडल्याने त्यांना काही सुचले नाही, मात्र आगीचा भडका पाहून कुटुंबिय आणि शेजाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग विझेपर्यंत लीलाबाई 65% भाजल्या होत्या. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी लीलाबाई यांचा मृत्यू झाला. लीलाबाई यांच्या घराच्या पाठीमागच्या अंगणात वडाचं मोठा झाड असून त्यातून पडणारा पालापाचोळा त्या नेहमीच जमा करून जाळत होत्या. थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास जाळलेल्या पालापाचोळ्या पासून शेकोटी करत शेक घ्यावा या उद्देशाने लीलाबाई पेटलेल्या शेकोटीच्या बाजूला उभ्या होत्या आणि तेव्हाच त्यांच्या गाऊनने पेट घेतला आणि ही दुर्दैवी घटना घडली.


शहरात ठिकठिकाणी शेकोट्या


शहराचा पारा घसल्याने शहरात ठिकठिकाणी नागरिकांकडून शेकोट्या पेटवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शेकोटी पेटविण्यासाठी रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, झाडाखालचा सुकलेला पाला पाचोळा आदींचा वापर करण्यात येतो. तर शेकोटी लवकर पेटावी म्हणून अनेकांकडून प्लास्टिकच्या पिशव्याही जाळतात. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होते. त्यामुळे शेकोट्या पेटवताना नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्यावीने करण्यात आले आहे.


थंडीचा कडाका वाढला, पारा 11.2 अंशांवर


विदर्भातील (Vidarbha) जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये रात्र कुडकुडत काढावी लागत आहे. त्यामुळं दिवसा कोवळं उन हवंसं वाटू लागलं आहे. नागपुरातही तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे. रात्री आणि पहाटे वाहणारे बोचरे वारे त्रासदायक ठरत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. रविवारी रात्री अनेक वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक तुरळक जाणवली.  रविवारी शहरात कमाल 11.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ते सरासरीपेक्षा 3 अंशाने कमी आहे. कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सरासरीपेक्षा 0.9 अंशाने कमी होते. 


ही बातमी देखील वाचा


Weather Update: विदर्भात थंडीचा जोर वाढला, गोंदियात सर्वात कमी तापमान तर नागपुरात पारा 11.2 अंशांवर