मुंबई : पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला आहे. आता यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालय मंगळवारी आपला निकाल जाहीर करणार आहे.


खंडणीच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले परमबीर सिंह हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे त्यांना फरार आरोपी घोषित करण्यात यावं, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी अर्जातून कोर्टाकडे करण्यात आली आहे. अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप तपासयंत्रणेसमोर आलेले नाहीत. ते बेपत्ता असल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे. या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 388, 389, 120 (ब) आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे. 


न्यायालयानं या तिन्ही आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते बजावण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे आढळले नाहीत. परमबीर यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतीश बुरुटे व खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर व त्यांचे कुटुंब मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळे हे तिघेही फरार झाल्याचं निष्पन्न होत असल्यानं त्यांना आता फरार घोषित करण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम 82 व 83 अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी असंही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आपल्या अर्जात म्हटलेलं आहे.


संबंधित बातम्या :