नागपूर: गरबा आयोजनात (Garba) फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) गरबा आयोजित करणाऱ्या मंडळांकडे केली आहे. दारावर आधार कार्ड (Aadhar) तपासण्यासाठी कार्यकर्ते नसल्यास विहिंपचे कार्यकर्ते उपलब्ध करून देऊ आणि पोलिसांनाही आम्ही बोलवू असं विश्व हिंदू परिषदेने सांगितलं आहे. 


गरबा उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्यावे, त्यासाठी गरबामध्ये येणाऱ्यांची आधार कार्ड तपासण्यात यावे अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून ते फक्त नृत्य नाही, तो इव्हेंटही नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यानी प्रवेशच करू नये. तिथे फक्त हिंदू धर्मियांनी प्रवेश करावे असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे.


गरबा उत्सवात श्रद्धा नसताना, देवी बद्दल भक्ती नसताना ही अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी असे गोविंद शेंडे म्हणाले. एवढंच नाही तर विहिंपने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गरबा उत्सवात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासणे आणि दरावरील व्यवस्थेसाठी आयोजन मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देणार आहे. 


Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेचा इतर धर्मियांना विरोध


गेल्या काही वर्षांपासून गरबा सणात फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जात आहे. गरब्याच्या कार्यक्रमात इतर धर्मिय लोक प्रवेश करतात आणि त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणे घडतात असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. यावरून आता दरवर्षी वाद होत आहे. खासकरून गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरबा आयोजकांकडून फक्त हिंदूंना या ठिकाणी प्रवेश देण्यात येतोय आणि इतर धर्मियांना विरोध केला जातो.  त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही केला जातोय. 


ही बातमी वाचा: