Nagpur Metro News : शालेय तसेच इयत्ता बारावीपर्यंतच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने तिकिट दरात 30 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या, मंगळवारी, 7 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तिकिटसाठी रोख किंवा महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे स्वस्त दरात मेट्रोतून शाळा, महाविद्यालयापर्यंतच नव्हे तर इतर भागातही प्रवास करता येणार आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रोने दिलासा दिला नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहन, सिटी बस किंवा ऑटोचाच पर्याय निवडावा लागणार असल्याची स्थिती आहे.


आयकार्ड दाखवला सवलत मिळवा


शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिकिट दरात 30 टक्के सवलत देण्याचे प्रस्तावित होते. मेट्रो स्टेशनवरील तिकिट खिडकीवर महाविद्यालय किंवा शाळेचे ओळखपत्र दाखवून 30 टक्के सवलतीच्या दरात तिकिट खरेदी करू शकतील. महाकार्डचा वापर करणाऱ्यांच्या सवलतीची रक्कम त्यांच्या कार्डमध्येच जमा केली जाईल. त्यांना पुढच्या टप्प्यातील महाकार्डमध्ये ही रक्कम राहणार आहे. यासाठी महाकार्डची सेवा देणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सॉफ्टवेअरमध्ये नव्या सवलतीनुसार सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत महाकार्डचा वापर करणाऱ्यांना दहा टक्के सवलत दिली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी यात 30 टक्के सवलतीनुसार सुधारणा करण्यात येणार आहे.


नागपूर मेट्रो सिटीबस, ऑटोपेक्षाही महाग?


मेट्रोतून प्रवासासाठी असलेल्या प्रत्येक किमीच्या टप्प्यासाठी ही सवलत राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलतीची नागरिकांची मागणी होती. या मागणीवरून महामेट्रोने विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलत उपलब्ध करून दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना फोटो असलेले ओळखपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. महामेट्रोच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मेट्रोतून प्रवासासाठी महिन्याला येणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. नागपूर मेट्रोतून विद्यार्थ्यांसह नागरिकांना नेहमीच सुरक्षित, प्रदूषणमुक्त व सहज प्रवासाची सेवा मिळत असून सवलतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास स्वस्त होणार आहे. मात्र दुसरीकडे महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सिटीबस, ऑटोचे दर नागपूर मेट्रोपेक्षा कमी असल्याने बचतीसाठी दुसरे पर्याय निवडावे लागणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अनेक मार्गावर नागपूर मेट्रोच्या तिकीटदरांपेक्षा सिटीबस आणि शेअरिंग ऑटोचे तिकीटदर निम्मे आहे.


ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा


नुकतेच कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने महामेट्रोला निवदेन देऊन विद्यार्थ्यांसाठी पास आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी केली होती. रस्त्यांवरील वाहतूक पाहता सध्या मेट्रो ट्रेन ही लोकांची गरज बनली आहे. ज्येष्ठ नागरिकही गरजेच्या वेळी मेट्रोची मदत घेत असले तरी अचानक भाडे वाढल्याने त्यांची अडचण होत आहे. किमान ज्येष्ठ नागरिकांना तरी भाड्यात सवलत द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, पलाश लिंगायत, हर्ष बर्डे, अधिकांश हिरेखान, कृशाप मेश्राम, अनंत नंदगावे, अर्श पाटील, राहत बारसागडे, उदय सिंग, आदेश मेश्राम आदींचा समावेश होता.