Nagur News :  मागील नऊ दिवसांपासून भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान (Sana Khan) या बेपत्ता असून अद्याप तिच्याविषयी काही ठोस माहिती मिळाली नाही. पण 1 ऑगस्ट रोजी अमित साहूसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झालं. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेली ती पुन्हा परतलीच नाही. अमित साहू आणि सना खान यांची  मैत्री होती. अमित साहू (Amit Sahu) हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. काही जण तर या दोघांनी लग्न केलं असल्याचा देखील दावा केला आहे. पण यामधील सत्यता अजून तरी पोलिसांकडून पडताळण्यात आली नाही. 


नेमकं काय आहे प्रकरण?


दरम्यान सना खान हिने जबलपूरला पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी तिने तिच्या घरच्यांना ती सुखरुप पोहचली असल्याचं कळवलं होतं.  1 ऑगस्ट रोजी सना आणि अमितमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. सना हिने दिलेली सोन्याची चैन अमितच्या गळ्यात दिसली नसल्यामुळे रागावलेल्या सना खान हिने थेट जबलपूरचा मार्ग धरला होता असं सांगण्यात येत आहे. पण सनाने तिच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर तिचा फोन बंद झाला. 


दरम्यान सना खान बेपत्ता झाल्यानंतर जबलपूर पोलिसांनी अमित साहूच्या हॉटेलमधील जितेंद्र गौड नावाच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याने जबलपूर पोलिसांना आणखी काही धक्कादायक माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला अमित साहू पोलिसांच्या हातात तुरी देऊन फरार झाला आहे.  यापूर्वीही अमित साहू एका दुहेरी हत्याकांडात सहआरोपी होता. तेव्हा तो तब्बल 41 दिवस फरार झाला होता. पण त्यानंतर त्याच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्यामुळे त्याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. 


सना खान हिच्या प्रकणात देखील दोन ऑगस्टपासून अमित साहू हा फरार आहे. त्यामुळे तो सध्या कुठे आहे याचं उत्तर नागपूर पोलिसांकडे देखील नाही. तसेच जोपर्यंत अमित साहू पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत सना खानविषयी कोणतीही ठोस माहिती मिळवता येणार नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सध्या जबलपूर आणि नागपूर पोलिसांकडून सना खान प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोणती नवी माहिती पोलिसांच्या आता लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनमध्ये 'सिगारेट'मुळे गोंधळ! डब्यात पसरला धूर; काचा फोडून प्रवाशांनी काढला पळ; पाहा व्हिडीओ