नागपूर : राजकारणातील हवा कोणत्या दिशेने वाहत आहे, याचं सर्वसाधारण अंदाज राजकीय सभा आणि राजकीय आयोजनातील गर्दीतून येत असतो मात्र, सध्या राजकीय वातावरणाचा अंदाज धार्मिक आयोजनाच्या माध्यमातून घ्यावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे का? आम्ही असा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे राज्यभरात सध्या सुरू असलेली धार्मिक आयोजनाची रेलचेल आणि त्यात येणारी भाविकांची अलोट गर्दी. अयोध्येत (Ayodhya) श्री रामाचे मंदिर (Shri Ram Temple) साकारले जात असताना एका योजनेतून राज्यात आणि संपूर्ण देशात हिंदुत्वाचा वातावरण निर्माण केला जात आहे का? असा प्रश्न ही यामुळे निर्माण होत आहे.
अमरावती मधील हनुमान गढी येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी एखाद्या राजकीय सभेसाठी आलेली नाही, तसेच ही प्रचंड गर्दी राजकीय नेत्यांनी आणलेली नव्हती. तर ही गर्दी पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी दाखल झाली. मात्र ही स्थिती फक्त अमरावती मधील नाही. पंडित प्रदीप मिश्रा नागपूरला आले असताना, तिथे ही अशीच गर्दी होती. तसेच मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री आले असताना अशीच स्थिती होती.
धार्मिक कार्यक्रमांना अलोट गर्दी
राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये सध्या मोठ्या संख्येने धार्मिक आयोजन होत आहेत. त्यामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. काहींना अशा आयोजनाच्या माध्यमातून मानसिक शांती आणि समाधान लाभते.काहींना असे धार्मिक आयोजन सध्याच्या वातावरणात आपल्या धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी आवश्यक वाटतात.तर काहींना पुढील पिढीसाठी अशा कार्यक्रमांमध्ये जावेसे वाटते.
दरम्यान, असे आयोजन होत असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या मागे राजकीय व्यक्तींचा सहभाग असतोच. तसेच संत महात्म्यांच्या मंचावर राजकीय व्यक्तींचा वावरही प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे देशात कोट्यवधी राम भक्तांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत असताना धार्मिक वातावरणाची निर्मिती आणि धार्मिक कार्यक्रम मतपरिवर्तन घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि त्याचे राजकीय परिणाम तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये ही दिसून आल्याचे अनेकांना वाटतंय.
हे सर्व आयोजन नियोजनबद्ध?
राजकीय विश्लेषकांना राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीख आणि त्या नंतर लगेच होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेता हे सर्व आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने केले जात असल्याचे वाटत आहे. या आयोजनाच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या लाखोंच्या गर्दी चा फायदा राजकीय दृष्टिकोनातून घेणे, आम्ही तुमच्याच विचाराचे आणि तुमच्यातलेच एक आहोत असे दाखवण्याचा राजकीय प्रयत्नही होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचा लोकार्पण होणार आहे. हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून सुमारे 500 वर्षांच्या लढ्याचा गोड शेवट तर होणारच आहे, मात्र सध्या ज्या हिंदुत्ववादी विचारांचं सरकार देशात सत्तेवर आहे. त्या हिंदुत्ववादी विचारांचा एक निर्णायक वैचारिक विजय राम मंदिराच्या माध्यमातून अधोरेखित होणार असल्याचं म्हटलं जातंय.
कदाचित त्यामुळेच या वर्षी संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना उद्देशून बोलताना राम मंदिराचा लोकार्पण होत असताना देशभर धार्मिकतेचे वातावरण निर्माण करायचे आहे हे स्पष्ट सांगितले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 24 ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीच्या भाषणात हा उल्लेख आहे.
तेव्हा सरसंघचालक काय म्हणाले होते?
आपल्या राज्यघटनेत प्रथम पानावर ज्यांचे फोटो आहे, त्यांच्या बाळ स्वरूपाचे भव्य मंदिर अयोध्येत साकारले जात आहे. 22 जानेवारीला त्याचा लोकार्पण होईल आपण सर्व तिथे जाऊ शकत नाही मात्र आपल्या अवतीभवती आपण धार्मिकतेचे वातावरण नक्कीच निर्माण करू शकतो, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघ परिवाराचा नेतृत्व करणाऱ्या मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या उत्सवात स्पष्ट आदेश दिल्यानंतर संघ परिवारातील विविध संघटना त्या कामी जोमाने लागल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.
राम मंदिराच्या लोकार्पणाची तयारी
राम मंदिराला केंद्रबिंदू ठेवून विविध संघटनांकडून काय प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतून आलेल्या अक्षदा आणि निमंत्रण घरोघरी पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतलाय. राज्यात 95 लाख तर देशभर सुमारे 6 कोटी कुटुंबांपर्यंत ह्या अक्षदा आणि निमंत्रण पोहोचवले जाईल. त्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघाचे स्वयंसेवक यांच्यासह इतर सामाजिक संघटनांची ही मदत घेतली जातेय. प्रत्येक वस्तीत, गावात 100 - 200 कार्यकर्त्यांचे ग्रुप तयार करून रामाच्या मंदिराची वार्ता आणि माहिती पोहोचवली जाणार आहे.
22 तारखेला राम मंदिराचा लोकार्पण होत असताना मोठ्या संख्येने लोक तिथे जाऊ शकणार नाही म्हणून विहिप ने "माझे मंदिर माझी आयोध्या" ही संकल्पना रुजवलीये. "माझे मंदिर माझी अयोध्या"या संकल्पने अंतर्गत लोकांनी त्यांच्या वस्तीत गावात असलेल्या कुठल्याही मंदिरा मध्ये 22 जानेवारी आणि त्याच्या जवळपास विविध धार्मिक कार्यक्रम घ्यायचे आहेत. लोकार्पण सोहळा मोठे स्क्रीन लावून देशभरातील लाखो ठिकाणी लाईव्ह दाखवला जाणार आहे. राम भक्तांना मोठ्या संख्येने अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेता येईल यासाठी विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत.
त्यासाठी विश्व हिंदु परिषदेने रेल्वे सोबत बोलणी केली असून लवकरच रेल्वे वेळापत्रक जाहीर करणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिरा संदर्भात वातावरण निर्मिती होईल यासाठी शेकडो कलावंतांशी संपर्क साधून गीत, वादनच्या माध्यमातून राममय वातावरण निर्मितीचे प्रयत्न ही सुरु आहेत. संस्कार भारतीसारख्या संस्था अयोध्येसह ठिकठिकाणी रांगोळी काढून जनजागृती करणार आहे.
1984 च्या निवडणुकीमध्येच काँग्रेसने अखेरच्या वेळेला देशाच्या लोकसभेत पूर्ण बहुमत प्राप्त करत 400 पेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या. तर त्याच निवडणुकीत भाजप अवघ्या दोन जागांवर सीमित राहिली होती. 1984 मध्येच विश्व हिंदू परिषदेने औपचारिकरित्या राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात केली होती. तेव्हा देशभर राम जानकी रथयात्रा काढली गेली होती. त्यानंतर एखादा अपवाद वगळता प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची संख्यात्मक प्रगती होत गेली आहे. त्यामुळे राम जन्मभूमीचा लढा पूर्णत्वास जाऊन भव्य राम मंदिराचा निर्माण होत असताना, देशात स्वाभाविकपणे निर्माण होणारे वातावरण किंवा नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण केले जाणारे वातावरण कसे राजकीय परिणाम निर्माण करू शकतात याचा विश्लेषण होण्याची गरज आहे.