नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) तिसरा दिवस हा आंदोलनाचा ठरणार आहे. कारण अनेक मोठे मोर्चे हे विधिमंडळावर धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीच राज्यात अनेक मुद्द्यांनी डोकं वर काढायला सुरुवात केली होती. त्याच मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात घमासान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान त्यातील काही मोर्चे हे उद्या विधीमंडळावर धडकणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा
उद्या सर्वात प्रमुख मोर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी वरून निघणारा मोर्चा विधिमंडळापर्यंत जाऊन सभेत रूपांतरित होईल. यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता सरसकट दुष्काळ जाहीर करावा, एकरी 50 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, विनाअट पीक विमा मंजूर करावा, शेतीसाठीचा लोडशेडिंग पूर्णपणे बंद करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा मोर्चा दीक्षाभूमीवरून विधिमंडळाच्या दिशेने मार्गस्थ होईल. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होतील
धनगर समाजाचा मोर्चा
धनगरांच्या आरक्षणासाठी सकल धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने उद्या धनगर समाजाचा मोर्चा काढला जाणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे तसेच धनगर मेंढपाळांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. यशवंत स्टेडियमवरुन निघणारा हा मोर्चा टेकडी रोडवर संपुष्टात येणार आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा विधीमंडळावर धडकणार आहे. त्यासाठी विदर्भवाद्यांचा मोर्चा हा विधीमंडळावर धडकेल. यशवंत स्टेडियमवरुन निघणारा मोर्चा हा झिरो माइल जवळ येऊन थांबणार आहे.
शिक्षकांचा मोर्चा : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नये या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार आहे.
आदिवासींचा मोर्चा : जनसेवा गोंडवाना पार्टीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे. इंदोरा मैदानातून निघणारा हा मोर्चा प्रामुख्याने आदिवासीच्या नावाखाली अनेक बोगस आदिवासींनी जात प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या बळकावल्याच्या मुद्द्यावर हा मोर्चा काढला जाईल.
भारत राष्ट्र समिती हिंगणघाट तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने उद्या विधिमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे.
हेही वाचा :