नागपूर : जे राजकीय पक्षांना जमलं नाही, मोठ मोठ्या संघटनांना जमलं नाही, ते यंदा असंघटित (All India Trade Union Congress) महिला कामगारांनी करून दाखवले आहे. आयटकच्या (All India Trade Union Congress) नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे नागपुरातील (Nagpur) शहीद गोवारी उड्डाण पुलाची (Govari Saheed Uddayan Pul) वाहतूक बंद करावी लागली आहे. या वर्षीच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आलेल्या सर्व मोर्चाच्या तुलनेत सर्वात विराट मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक ) च्या वतीने काढण्यात आला.  मोर्चा काही वेळापूर्वी  विधानभावन जवळच्या जीरो माईल टी पॉइंटवर दाखल झाला आहे. 


विधानभवानावर आलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो महिला सहभागी झाल्या आहेत. आशा गटप्रवर्तक, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने असंघटित महिला कामगार या मोर्चात सहभागी  झाल्या आहेत. प्रशासनाने गृहीत धरलेल्या संख्येपेक्षा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व मोर्चेकरी सहभागी झाल्या. नागपूर येथील अधिवेशन काळात पहिल्यांदाच शहिद गोवारी उड्डाणपूलावरची वाहतूक बंद करावी लागली आहे. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाच्या दिवशी ही एवढी गर्दी झाली नव्हती, तेवढी गर्दी आज जमली.


आयटकच्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या कोणत्या ?


1) कामगार व कर्मचारी विरोधी कायदे रद्द करा..


2) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन 26 हजार रुपये व मासिक पेन्शन द्या..


3) राष्ट्रीय संपत्ती व सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घ्या.. 


4) आठ तासाच्या कामासाठी दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन निश्चित करा. यासह एकूण 22 मागण्या आहेत. 


वाहतुकीवर परिणाम - 


आयटक च्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे झिरो माईल ते वैरायटी चौक संपूर्ण वाहतूक थांबवावी लागली आहे.शहीद गोवारी उड्डाण पूल बंद करावे लागले आहे. 
पूर्ण जागेवर मोर्चातील महिलांना बसवून ही मोर्चेकरी अजून बाहेर शिल्लक आहेत. नागपूर येथील सीताबर्डी ते झिरो माईल अशी वाहतूक या वर्षी पहिल्यांदाच बंद करावी लागली आहे.