नागपूर : उन्हाळ्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कमध्ये जाण्याचा बेत आखत असाल, तर थोडी काळजी घ्या. कारण नागपुरातील द्वारका वॉटर पार्कमध्ये संपूर्ण दिवस धमाल केल्यानंतर तीसपेक्षा जास्त तरुणांच्या त्वचेला त्रास झाला आहे.
नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 56 तरुण-तरुणींचा ग्रुप 28 एप्रिलला नागपूर जवळच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये गेला होता.
सर्वांनी दिवसभर वॉटर पार्कमध्ये विविध राईड्स आणि खेळांचा आनंद लुटला. संध्याकाळपर्यंत धमाल करुन हा ग्रुप नागपूरला परत आला
निघतानाच अनेकांना डोळे प्रमाणापेक्षा जास्त लाल झाल्याचं आणि जळजळ होत असल्याचं लक्षात आलं होतं. मात्र आपण पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे असं झालं असावं, हा विचार करुन सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र सर्व तरुण सध्या अभ्यास सोडून एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहेत.
दुसऱ्या दिवसापासून 56 जणांपैकी 36 तरुण-तरुणींना शरीराच्या विविध भागांवर त्रास व्हायला लागला. कोणाला त्वचेवर पुरळ आली, अंगावर दाणे उठले, तीव्र खाज यायला लागली. तिसऱ्या दिवसापासून संक्रमण झालेल्या ठिकाणी त्वचा सोलून निघू लागल्याने सर्वांनी औषधोपचार सुरु केले.
औषधांनी स्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित वॉटर पार्कच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. मात्र त्यांनी कोणतीच दाद न दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्थानिक खापा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला असून आम्हाला पाण्याची गुणवत्ता तपासावी लागेल, असं सांगत सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवलं आहे.
दरम्यान, 'एबीपी माझा'ने या विषयावर द्वारका वॉटर पार्कच्या व्यवस्थापनाशी फोनवर संपर्क केला, तेव्हाही त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्या दिवशी पार्कमध्ये सुमारे बाराशे जणांनी प्रवेश केला होता. मात्र, त्यापैकी फक्त याच एका समूहातील तरुणांना असा त्वचेचे त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पाण्यातून बाहेर आल्यानंतर नीट आंघोळ केली नसावी, म्हणून त्यांना क्लोरीनच्या पाण्याचा त्रास झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.
नागपुरात वॉटर पार्कमध्ये पाण्यात डुंबल्यानंतर 36 तरुण-तरुणींची त्वचासंसर्गाची तक्रार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2019 05:43 PM (IST)
नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 56 तरुण-तरुणींचा ग्रुप नागपूरजवळच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये गेला होता. दिवसअखेर आपल्याला त्वचेचा त्रास झाल्याची तक्रार काही जणांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -