नागपूर : आज सोशल मीडिया दिवस आहे. या सोशल मीडियाचा अयोग्य आणि अनियंत्रित वापर जीवघेणा ठरु शकतो. याचाच प्रत्यय नागपुरात आला आहे. युट्युबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहून तशीच कृती केल्याने नागपुरात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.


नागपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरात ही घटना घडली आहे. गळफास घेण्यापूर्वी सदर मुलगी तिच्या लहान बहिणींसोबत मोबाईलवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहत होती, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या एका परिवारातील तीन बहिणी गेले दोन दिवस आपल्या आईच्या मोबाईलवर आत्महत्या कशी करायची याबाबतचे व्हिडीओ पाहत होत्या.

त्यांनी व्हिडीओत दिलेले प्रात्यक्षिक घरातच करून बघितले. युट्युबवर दाखवलेल्या प्रमाणे पंखा, नायलॉन दोरी आणि त्याचे केलेले हुक असे सर्व साहित्य जमवत हा फाशीचा खेळ ह्या मुली आपल्याच घरी खेळत होत्या. या दरम्यान, फाशी लागली हे सांगत जेव्हा तिच्या लहान बहिणी आईकडे दुसऱ्या खोलीत गेल्या. तेव्हा आई धावून तर गेली. यानंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.