नागपूर : नागपूरमधील रामटेक तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.


नागपुरात रामटेक आणि मौदा तालुक्यात आज वीजेच्या गर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी आसोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीजवळ आज संध्याकाळी 4 ते 5 च्या वाजेच्या दरम्यान वीज कोसळली. यावेळी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होती. या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत.



शाळेच्या छताचं आणि इमारतीचं प्लास्टर खाली पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. नयन कडबे आणि तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते, त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यत आलं आहे.