नागपूर: जिल्ह्यातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाक्याच्या आतषबाजीमुळे 11 महिला भाजल्याने जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजताच सुमारास उमरेडमधील (Umred) इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळ ही घटना घडली.शिवस्नेह मंडळाची गणपती विसर्जन (Ganesh Visarjan 2024) मिरवणूक सुरू असताना मिरवणूक मार्गावरील एका निर्माणाधीन इमारतीवर फटाक्यांची (firecrackers) आतषबाजी सुरु होती. मात्र, त्यापैकी काही फटाके आग लावल्यानंतर वर न जाता खालच्या दिशेने गेले आणि मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडले. त्यामुळे 11 महिला भाजल्याने जखमी झाल्या. जखमी महिलांपैकी सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार महिलांना उमरेड मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


नेमकं काय घडलं?


शिवस्नेह गणेश मंडळाची मिरवणूक इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळून चालली होती. याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी या इमारतीवर व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार मिरवणूक या परिसरात आल्यानंतर या इमारतीवरुन फटाक्यांना बत्ती देण्यात आली. मात्र, हवेत जाऊन फुटणारे हे फटाक्यांचे तोंड अचानक खालच्या दिशेने वळाले. यावेळी इतवारी रोडवर मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी मिरवणुकीत ढोलपथकाचे सदस्यही उभे होते. हवेत जाणारे हे फटाके खालच्या दिशेने वळाल्यानंतर ते थेट खाली येऊन फुटायला लागले. 


ढोल पथकातील तरुण-तरुणींच्या अंगावरही काही फटाके येऊन फुटले. त्यामुळे सुरुवातील अनेकांना नेमके काय झाले, हे कळत नव्हते. आकाशातून बॉम्बचा वर्षा झाल्याप्रमाणे सगळीकडे फटाके फुटत होते, त्याच्या ठिणग्या उडत होत्या आणि प्रचंड धूर पसरला होता. यावेळी रस्त्याच्या कडेला काही महिलाही उभ्या होत्या. इमारतीवरील फटाक्यांच्या अनेक फैरी या महिलांच्या अंगावर येऊन थेट आदळल्या. हे फटाके थेट महिलांच्या अंगावर फुटल्याने त्यामधील दारुमुळे महिला चांगल्याच भाजल्या. या घटनेमुळे काहीवेळासाठी परिसरात एकच खळबळ उडाली होती. 


राज्यात विसर्जनावेळी 21 जणांचा मृत्यू


गणपती विसर्जनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नऊ, विदर्भातील सात,तर विरारमध्ये एक जण दगावला आहे. याखेरीज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात दोन व इंदापूरमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने तीन लहान मुलांचा मृत्यू झाला होता.


VIDEO: नागपूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकांच्या अंगावर फटाके फुटले



आणखी वाचा


भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली