भिवंडी : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan 2024) मोठा राडा झाला होता. विसर्जन मिरवणुकीवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. यावरुन दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. या हिंसाचारानंतर आता भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (Shrikant Paropkari) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी मध्यरात्री भिवंडी येथून एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक वंजारपट्टी नाका परिसरात आली असता अचानक दगडफेक झाल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर परिसरात मोठा जमाव गोळा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार
आरोपींविरोधात कारवाई झाल्याशिवाय गणेश विसर्जन होणार नाही, अशी मागणी मंडळातील कार्यकर्त्यांनी केली होती. यानंतर परिसरात मोठा जमाव जमल्याने परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जात होती. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची बदली
भिवंडी शहरात गणपती विसर्जन तसेच ईद मिलादुन्नबी मिरवणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत मिळत होते. अखेर बुधवारी रात्री उशीरा भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांची बदली मुख्यालयात करण्यात आली. तर मुख्यालय एकचे उपायुक्त मोहन दहिकर यांची भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परोपकारी यांची काही महिन्यांपूर्वीच विशेष शाखेतून भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. भिवंडीतील दोन गटामध्ये झालेला वाद परोपकारी यांना भोवल्याचे दिसून येत आहे. प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळता न आल्याने बदली झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जळगाव जामोदमध्येही दगडफेक
दरम्यान, बुलढाण्यातील जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणूक सुरू असताना येथील विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली. सुमारे अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. यामध्ये काही तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भारा, वायली वेस या भागात ही घटना घडली. या भागातील गणपती मंडळे विसर्जन मिरवणुकीत सामील झाली असताना आणि मिरवणुकपुढे सरकत असताना अचानक दगडफेक सुरु झाली होती.
आणखी वाचा
वर्सोव्यात अज्ञातांकडून शिंदेंच्या सेनेच्या कार्यालयावर दगडफेक, आरोपींचा शोध सुरू