नागपूर : शिवसेना शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश न मिळाल्याने परत जावं लागलं. नागपुरातील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे गेट न उघडल्याने परत जावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेट बंद केल्यामुळे परत जातोय असं सूचक वक्तव्य यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केलं. या प्रकरणाची आता जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात त्यांच्या शासकीय निवासस्थानी, रामगिरी निवासस्थानी मुक्कामी आहेत. यावेळी शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. पण गेटवर ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही.


बाहेरून कोणालाही आत सोडू नये असे निर्देश आतून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यामुले कोणालाही आत सोडता येत नाही असे कारण यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी भोंडेकर यांना दिले. त्यानंतर नरेंद्र भोंडेकर पुन्हा भंडाऱ्याला परत निघून गेले. 


मात्र, परत जाताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी  "आपल्याला एन्ट्री न दिल्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेट बंद केल्यामुळे परत जात आहोत" अशी सूचक प्रतिक्रिया दिली.


नरेंद्र भोंडेकर सुरुवातीपासून शिंदेंसोबत 


भंडारा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासून शिंदे गटासोबत आहेत. शिवसेनेत बंडखोरी करून ज्यावेळी शिंदे गटाचे सर्व आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यावेळी नरेंद्र भोंडेकरही त्यासोबत गेले. गुवाहाटीमध्येच भोंडेकरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता आणि त्याची चर्चाही झाली होती. 


ही बातमी वाचा: