Nagpur News: नागपूरचे उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत का??? कारण नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या उड्डाणपूलांवर एका आठवड्यात झालेल्या दोन घटनांमध्ये उड्डाणपूलांवरून खाली कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशाच एका अपघातात संपूर्ण कुटुंब गमावणाऱ्या किरण खापेकरने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर आणि त्याकडे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, आता तरी किमान कारवाई करा, शहरातले उड्डाणपूल सुरक्षित बनवा अशी मागणी केली आहे. 


नागपूरच्या अमर शहीद गोवारी उड्डाण पुलावर रोड मार्क फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात उड्डाणपुलाची काँक्रीटची संरक्षण भिंत 2 फुटांची, तर त्यावरील लोखंडी ग्रील 14 इंचाची असल्याचे समोर आले आहे. उड्डाणपुलावर याच सव्वा तीन फूट उंचीच्या संरक्षनावरून खाली कोसळून अनिता दिलपे या 30 वर्षीय महिलेचा काल रात्री अपघाती मृत्यू झाला. अनिता या आपल्या पतीसह रहाटे कॉलनी कडून मॉरिस टी पॉइंटच्या दिशेने जात असताना उड्डाण पुलाच्या मधोमध विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी चालवणारे रुजवेल्ट दिलपे उड्डाणपूलावरच कोसळले आणि गंभीर जखमी झाले. मात्र अनिता दिलपे दोन फुटांची काँक्रीटची भिंत आणि त्यावरील सव्वा फुटाची ग्रील ओलांडून पन्नास फूट खाली कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


तसेच 9 सप्टेंबरच्या रात्री जेव्हा सर्वजण गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दंग होते. त्याच वेळेस नागपूरच्या सक्करदरा परिसरातील उड्डाणपूलावर अशीच घटना घडली होती. मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवून कार चालवताना मोबाईल वापरून समोरून येणाऱ्या खापेकर कुटुंबीयांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. त्या धडकेमुळे सक्करदरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटच्या संरक्षण भिंतीला ओलांडून विनोद खापेकर, त्यांचे वेदांत आणि विवान नावाचे दोन मुलं आणि वृद्ध आई लक्ष्मी सुमारे 70 फूट खाली सक्करदरा चौकावर कोसळले होते. यात या चौघांचा मृत्यू झाला होता. काल नागपुरात तशीच घटना घडली आणि सक्करदरा पुलावर एक आठवडापूर्वी आपला सर्वस्व गमावणाऱ्या किरण खापेकर समोर आल्या आणि एबीपी माझाच्या माध्यमातून त्यांनी मद्यपान करून वाहन वाहन चालवणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मद्यपान करून रस्त्यावर मौजमजा करणारे दुसऱ्यांच्या जीवन उद्ध्वस्त करतात. तेव्हा ते वाहन चालवत नाही तर त्यांची दारू वाहन चालवत असते, अशी तीव्र प्रतिक्रिया किरण खापेकर यांनी दिली आहे.


नागपुरात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या आणि अपघात प्रवण स्थळांबद्दल जनजागृती करणाऱ्या रोड मार्क फाउंडेशनच्या राजू वाघ यांच्या मते नागपूरच्या उड्डाणपूलांवर संरक्षण भिंती आवश्यकतेपेक्षा कमी उंचीच्या आहेत आणि अशावेळी अपघात होऊन दुचाकी स्वार खाली फेकल्या जाण्याची घटना घडवून अनेक लोकांचे मृत्यू होत आहे.  त्यामुळे वाहतूक पोलीस किंवा महानगरपालिका दोघांनी मिळून नागपुरातील विविध उड्डाण पुलांच्या काँक्रीटच्या संरक्षण भिंतीच्यावर लोखंडी ग्रील बसवण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. लोखंडी ग्रीलमुळे कदाचित अपघातामध्ये दुचाकी स्वार जखमी होतील. मात्र त्यांच्या जीव जाणार नाही, ते उड्डाण पुलावरून खाली फेकले जाणार नाही असा तर्क त्यांनी समोर ठेवला आहे.


दरम्यान, दिल्लीमध्ये अनेक उड्डाणपूलांना लोखंडी ग्रीलचे संरक्षण लावण्यात आले आहे. नागपुरातही ज्या उड्डाणपूलांच्या खालून रेल्वे जाते. त्या ठिकाणी अशा लोखंडी संरक्षण ग्रील पाहायला मिळतात. शिवाय अमरावती शहरात उड्डाणपुलावरील अपघातांची संख्या वाढल्यानंतर काही उड्डाणपूलांवर वाहनांची खास करून चार चाकी वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर्स बनवण्यात आले आहेत. मोठ्या शहरांमध्ये उड्डाणपूलांवर वाहतूक पोलिसांकडून स्पीड गन बसवून चालन कारवाया केल्या जातात. नागपुरात तसे उपाय करता येईल का आणि नागपूरकरांचा जीव वाचवता येईल का याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.