Nagpur News : पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Nagpur Police Commissioner) यांनी सडक्या सुपारीविरोधात मोहीम राबवून अनुप महेश नागरियावर दोनदा कारवाई करून 8 कोटींची सुपारी जप्त केली होती. जप्त सुपारीचे सॅम्पल तपासले असता ती खाण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले. नियमानुसार ती सुपारी पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन विभाग (FDA) कडे सोपविली. परंतु 8 कोटी रुपयांची सुपारी कुठे गेली, त्याचे काय झाले, याची माहिती विभागीय अधिकारी देण्यात असमर्थ ठरले. याप्रकरणी प्रशासन आता पुन्हा जागे झाल्याची माहिती आहे. सध्या सावनेर (Saoner) आणि जवळपासच्या भागात मोठ्या प्रमाणात आयातीत सुपारी डम्प केली जात आहे. दररोजच्या मागणी पुरवठ्यावर प्रभाव पडू नये म्हणून काही व्यापारी भंडारा आणि गोंदियामध्येही माल ठेवत असल्याची सूत्रांची माहिती आहे.  


अवैध सुपारीच्या धंद्यावर कोणाचा वचक?


दक्षिण भारतातील सुपारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही लोकांमुळे नागपुरातील संपूर्ण सुपारी मार्केट बदनाम झाला आहे. त्यामुळे बाजारात नियमानुसार व्यवसाय होण्यासाठी आयुक्तांकडून आता अपेक्षा वाढल्या आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनात डीपीसींनी केलेली कारवाई योग्य होती. सर्व माल निकृष्ट आढळून आला होता. परंतु एफडीएच्या 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करण्याच्या कार्यप्रणालीमुळे अशा लोकांवर पुढे कारवाई करता आली नाही.


मुंबईवरुन चालतोय गोरखधंदा


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोस्वामी आणि नुराणी मुंबईत बसून सुपारीचा व्यवसाय ऑपरेट करत आहेत. हे लोक चुकीची माहिती देऊन मुंद्रा बंदरावर माल बोलावत आहेत. नागरियानेसुद्धा प्लास्टिक पीयू मालाच्या नावावर 4.60 कोटींची सुपारी बोलावली होती. सुपारीवर 100 टक्के शुल्क असल्याने लपून-छपून सुपारी बोलावली जाते. यामुळे केंद्र सरकारला दररोज लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. यावर देखरेख ठेवणारा विभाग डीआरआयसुद्धा (DRI) मौन धारण करून आहे. यामुळेच वंसानी, नवलदास, राजेश, आशीष, जालंधर, संजय, पटना, राजू, आनंद, धीरज, मुनावेर, काजी यासारख्या लोकांना गोरखधंदा करण्याची संधी मिळत आहे.


फक्त 82 लाखांचा माल जप्त


एफडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून 20 सप्टेंबरपर्यंत सुपारीचे 16 नमुने घेण्यात आले. तपासणी पाठविण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी 3  रिपोर्ट आले आहेत. यातील 2 नमुने सुरक्षित तर एक असुरक्षित आढळले.  यादरम्यान एकूण 82.32 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 13 नमुन्यांचे रिपोर्ट अजूनही येणे शिल्लक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur News : स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटीत घोटाळा, शिवशाहीत प्रवाशांना चक्क शून्य पैशांचे तिकीट


मापात पााप! शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ, 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ, शिक्षकाने केला भांडाफोड