भंडारा : शालेय पोषण आहारातील तांदूळ वाटपात घोळ केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघड झाला आहे. एका जागृत शिक्षकामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ भरून तो 50 किलो म्हणून वाटप करण्यात येत होते.
विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान भोजन दिले जाते. यासाठी लागणारे साहित्य कंत्राटदाराच्या माध्यमातून शाळांना पुरवठा केला जातो. मात्र, आता यामध्ये घोळ होत असल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात समोर आली आहे. 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ भरून तो 50 किलो म्हणून वाटप करण्यात येत होते. परंतु, एका शिक्षकाच्या जागृतपणामुळे या घोटाळ्याचा भांडाफोड झालाय.
श्रीहरी राईस अँड अग्रो ली गोंदिया यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवनाळा येथे तांदूळ पाठविण्यात आले होते. त्यावेळी येथील सहाय्यक शिक्षक जयसिंग राठोड यांना तांदळाच्या गोणीत तांदूळ कमी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी वजनकाटा लावून मोजण्याची सक्ती केली असता त्यात प्रती कट्टा पाच ते सहा किलो तांदूळ कमी आढळून आले.
श्रीहरी राईस अँड अग्रो ली गोंदिया यांच्याकडून दिलेल्या बिलानुसार पन्नास किलो सातसे ग्राम वजन अपेक्षित होते. मात्र, त्यातील एकही कट्टा या वजनाचा भरला नाही. या विषयी शाळेतील शिक्षकांनी विचारणा केली असता कमी वजनाचे कट्टे परत गाडीत टाकत नवीन कट्टे देण्यात आले. मात्र, या घटनेमुळे कंत्राटदार तांदूळ वाटपात घोळ करत असल्याचे उघड झाले आहे.
राज्य आणि केंद्र शासनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिल्लक व उपयोगात आणलेला साठा नोंद करावा लागतो. मात्र, अशाप्रकारे येणारे पोषण आहारचे साहित्याच कमी येत असेल तर स्वयंपाकाचे साहित्य कुठून आणायचे याचा प्रश्न शिक्षकांना पडतो. शिक्षकांनी आलेला स्वयंपाक साहित्य स्वीकारायचा आधी त्याची मोजणी केल्यास ही फसवणूक टाळता येईल. मात्र, अशा पद्धतीने स्वयंपाक साहित्याची अफरातफर करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही होव्ही अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या