Nagpur News : बाळ तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या श्वेता खानच्या टोळीने देशातील विविध राज्यात बाळांची विक्री (child trafficking) केली आहे. प्रकरणाच्या तपासादरम्यान मानवी तस्करी विरोध पथक (एएचटीयू) ला आणखी एका बाळाची गुजरात (Gujrat) येथे विक्री केल्याची माहिती मिळाली. श्वेता खान आणि तिच्या टोळीला आधीच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बाळ खरेदी करणारे मोनिका विनय सुलतयानी (31), विनय सुलतयानी (36) दोन्ही रा. वडोदरा, गुजरात आणि विशाल इश्वरलाल चंदनानी (28) रा. सनशाईन सोसायटी, अहमदाबाद यांना अटक केली आहे.
चोरी झालेल्या बाळाच्या प्रकरणात पोलिसांनी (Nagpur Police) श्वेता उर्फ आयशा खान (45) सह सीमा उर्फ परवीन अंसारी (40) आणि सचिन पाटील (40) ला अटक केली होती. पोलिस कोठडीत आरोपींची सखोल चौकशी केली असता माहिती मिळाली की, सीमा आणि सचिनने एका महिलेची श्वेताशी भेट घालून दिली होती. ती महिला अनैतिक संबंधातून गर्भवती होती. तिला कोणाचाही आसरा नव्हता. श्वेताने त्या निराधार महिलेला आसरा देण्याच्या बहाण्याने तिच्या लालबर्रा, बालाघाट या गावी नेले. दोन महिन्यापर्यंत तिचा सांभाळ केला. 4 सप्टेंबर 2022 ला महिलेने एका मुलीला जन्म दिला. श्वेताने अहमदाबादच्या विशाल चंदनानीशी संपर्क करून मुलीबाबत सांगितले.
2.90 लाख रुपयात झाला चिमुकलीचा व्यवहार
ती मुलगी केवळ 4 दिवसांचीच होती, जेव्हा चंदनानी नागपुरात आला. छोटा ताजबाजवळील महाकाळकर भवनसमोर आरोपींनी त्याला मुलगी सोपवली आणि 2 लाख 90 हजार रुपये घेतले. पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तत्काळ एएचटीयूचे (AHTU) पथक गुजरातला रवाना झाले आणि अहमदाबाद येथून विशालला तसेच वडोदरा येथून सुलतयानी दाम्पत्याला अटक केली. पोलिसांनी दोन महिन्याच्या मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशालने पोलिसांना सांगितले की, त्याची बहीण मोनिका हिला बाळ होत नव्हते. आयव्हीएफच्या (IVF) माध्यमातून तिने एका बाळाला जन्म दिला होता, मात्र 4 महिन्यानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला. तेव्हापासून मोनिकाला मोठा मानसिक धक्का बसला होता. गोंदिया येथे राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून त्याला सचिन पाटीलचा नंबर मिळाला. त्याने अधिकृतरित्या बाळ दत्तक देण्याचे आश्वासन दिले होते. ही कारवाई सपोनि रेखा संकपाळ, गजानन चांभारे, पोहवा संतोष जाधव, राजेंद्र अटकले, ज्ञानेश्वर ढोके, मनीष पराये, सुनील वाकडे, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, पूनम शेंडे आणि पल्लवी वंजारी यांनी केली.
ही बातमी देखील वाचा