Nagpur News : नागपुरातील संघाचे कार्यालय (RSS Office) सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. काही दिवसांपूर्वी संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देऊ (bomb blast threat), असे धमकीचे पत्र पोलिसांना मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, धमकीच्या या प्रकरणाचा अखेर 'नाट्यमय' झाला असून त्यामागे विघ्नसंतोषी माणसानं केलेलं नाटक कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या संदर्भात वीज विभागातील (महापारेषण) उच्च पदस्थ अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


नागपूरचे कविवर्य सुरेश भट सभागृह (Suresh Bhat Auditorium), रेशीम बाग मैदान तसेच त्याच्या शेजारी असलेले रेशिमबाग येथील संघाचे कार्यालय बॉम्बस्फोटाने उडवून देऊ असे धमकीचे पत्र नागपूर पोलिसांना मिळाले (Nagpur Police) आणि एकच खळबळ उडाली होती. 25 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये स्पीड पोस्टने हे पत्र प्राप्त झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी पत्र पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला. मात्र, नागपुरात रोज हजारो पत्र स्पीड पोस्टने (Speed Post) पाठवले जात असल्याने धमकीचे पत्र पाठवणाऱ्याला शोधणे गवतातून सुई शोधण्यासारखे होते. पोलिसांनी पत्र आलेल्या पोस्ट ऑफिसच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि 24 नोव्हेंबर रोजी एक संशयित व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्ट करायला आल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्यावर हेल्मेट आणि तोंडावर मास्क घातलेली ही व्यक्ती आपण कोणाला ओळखू येणार नाही अशा अविर्भावात पोस्ट ऑफिस मध्ये स्पीड पोस्ट करायला आली होती. कोणाशीही एक शब्द न बोलता सक्करदारा पोलीस स्टेशनला स्पीडपोस्टने पत्र पाठवून ही व्यक्ती तिथून रवाना झाली.


पोलिसांनी त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या जवळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि धमकीचे पत्र स्पीड पोस्टने पाठवणारी ती व्यक्ती नागपूरच्या अंबाझरी परिसरात गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पत्र पाठवणाऱ्या त्या व्यक्तीला काल ताब्यात घेण्यात आले आणि एकानंतर एक धक्कादायक खुलासे होऊ लागले. भट सभागृह तसेच रेशीम बागेतील संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारी ती व्यक्ती वीज विभागातील (महापारेषण) उच्च पदस्थ अधिकारी निघाली आहे.


यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले, असे धमकीचे पत्र देण्याचं कारण काय याची विचारणा जेव्हा पोलिसांनी केली. तेव्हा माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती म्हणून धमकीचे पत्र लिहिल्याची कबुली त्या अधिकाऱ्याने दिली. मात्र पोलिसांचा समाधान त्याच्या उत्तराने झालं नाही. पोलिसांनी आणखी धागे शोधून काढले आणि तेव्हा 25 नोव्हेंबरला भट सभागृह उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि नेमकं त्याच दिवशी भट सभागृहामध्ये वीज मंडळाची विभागीय स्तरावरची नाट्य स्पर्धा होती. आपल्याच विभागाची ही स्पर्धा होऊ नये त्याच्यात विघ्न पडावं त्यासाठीच हे कृत्य त्या अधिकाऱ्याने केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


फक्त आपल्या विभागातील कार्यक्रम पार पडू नये. त्यात विघ्न यावं यासाठी धमकीचे हे नाट्य रचण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र धमकीच्या त्या पत्रात संघाच्या रेशीम बाग येथील कार्यालयाचा उल्लेख असल्यामुळे 25 तारखेपासून कालपर्यंत सहा दिवस नागपूर पोलिसांची झोप उडाली होती.


ही बातमी देखील वाचा


ED Raids: नागपुरातील सुपारी व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी; सकाळपासून कारवाई सुरु