Nagpur News नागपूर : किराणा व्यापाऱ्याला लुटल्यानंतर पकडल्या जाण्याच्या भीतीने दोन लुटारूंपैकी एकाने हवेत गोळीबार (Firing) केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अंदाधुंद गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना नागपूरातील (Nagpur News) कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा दीपसिंगनगर परिसरात मंगळवार, 18 जानेवारीच्या रात्री उघडकीस आली. गोळीबार करणारे अद्यापही मोकाट आहेत. पंकज सावलदास शंभवानी असे या 40 वर्षीय व्यापाऱ्याचे नाव असून ते नागपूरच्या खामला येथील रहिवासी आहे.


हवेत दोन वेळा गोळीबार


पंकज शंभवानी यांचे कपिलनगरमधील संत कबीरनगर चौकात सिमरन शॉपी नावाने किराणा दुकान आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे पंकज शंभवानी यांनी आपले दुकान बंद करून घराच्या दिशेने निघाले. दरम्यान त्यांनी एका कापडाच्या पिशवीत घरी नेण्यासाठी किराणा ठेवला. दुकान बंद करताना पिशवी दुकानाबाहेरील पायऱ्यांवर ठेवली. दुकान बंद करताना मोटारसायकलवर चेहऱ्याला कापड बांधलेले दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यातील एकाने त्यांना देशी बनावटीचा कट्टा दाखविला आणि पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही शंभवानी यांनी पिशवी न सोडल्याने लुटारूने त्यांना धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडले.


या दरम्यान शंभवानी यांनी आरडाओरड केली असता हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. दरम्यान यातील दोन तरुण आपल्याकडे येत असल्याचे लुटारूंना दिसले. त्यानंतर त्यांनी आपला पळ काढला असता तरुणांनी मोटारसायकलने या लुटारूंचा पाठलाग केला. त्यावेळी आपण पकडले जाऊ, या भीतीमुळे यातील एका लुटारूने युवकांच्या दिशेने देशी कट्ट्यातून दोन वेळा गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळी वाहनाच्या टायरमध्ये शिरली. त्यामुळे या अज्ञात लुटारूंना पळ काढण्यात यश आले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. 


अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल


घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कपिलनगरातील गोळीबार झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी सुरू केली असता पोलिसांना एक जिवंत काडतुस घटनास्थळी आढळले. या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार दुल्ला नावाचा संशयित आरोपी असल्याची शंकाही पोलिसांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा :