नागपूर : नागपूरच्या (Nagpur) सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला आग (Fire) लागली. या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. गुरुवार 18 जानेवारी रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा घराला आग लागली त्यावेळी या लहान मुलांची 7 वर्षांची बहिण घरात होती.
दरम्यान आगीची घटना घडताच ही चिमुरडी घाबरुन घराच्या बाहेर आली. पण ही दोन मुलं मात्र घरातचं अडकली. या घटनेत देवांश उईके आणि प्रभास उईके या दोन भावांचा मृत्यू झाला. थंडी पासून बचावासाठी शेकोटी पेटवली असता घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना जेव्हा घडली त्यावेळी या मुलांचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते.
नेमकं काय घडलं?
थंडी वाजत असल्याने घरातच या भावंडांनी शेकोटी पेटवली. त्यावेळी या मुलांचे वडील कामावर होते. तसेच मुलांची आई ही शेजाऱ्यांकडे कामानिमित्त गेली होती. त्यावेळी घरात ही तीनच भावंड होती. त्याचवेळी घराला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे या मुलांची बहिण घाबरुन गेली आणि गोंधळून बाहेर आली. पण तिचे दोन्ही भाऊ मात्र घरामध्येच अडकले. या चिमुरड्यांना या आगीतून बाहेर देखील पडता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.
शेकोटीमुळे आग लागल्याचा अंदाज
या मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बहिणीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. पण तोपर्यंत दोन्ही भावांचा भाजल्याने मृत्यू झाला होता. ज्यावेळी घराला ही आग लागली त्यावेळी घरात दोन सिलेंडर होते. पण त्या सिलेंडरपर्यंत आग पोहचण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाला आग विजवण्यात यश आले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
झोपडीवजा घराला ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रुग्णवाहिकेला देखील तातडीने बोलावण्यात आले. परंतु या तोपर्यंत दोन्ही मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता.