Nagpur Crime News : स्वस्त किंमती सोने उपलब्ध करून देण्याची थाप मारून कोलकाताच्या सराफा व्यावसायिकांनी शहरातील व्यापाऱ्याची 4 कोटी रुपयांनी फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशानंतर बजाजनगर पोलिसांनी (Nagpur Police) आरोपी व्यावसायिकांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. गोपाळकृष्णा बंका, राघव बंका, राहुल बंका, राजकिशोर बंका, अनिलकुमार बंका आणि योगेशकुमार बंका (सर्व रा. बुर्रा बाजार, कोलकाता) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे कोलकातामध्ये मेसर्स जी. के. ट्रेक्सिम प्रा. लि. आणि मेसर्स बंका बुलियन्स प्रा. लि. कंपनीचे संचालक आहेत. आशुतोष नटवर मुंदडा (वय 38) रा. रामदासपेठच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आशुतोष हे पेट्रोलियम, ट्रांसपोर्ट आणि सराफाचा व्यवसाय करतात. बंका कुटुंब आणि मुंदडा मुळचे ओडीसा येथील रहिवाशी असल्याने त्यांच्यात जुनी ओळख होती. ऑक्टोबर 2016 मध्ये गोपाळ बंका यानं आशुतोषच्या वडिलांशी संपर्क केला. सराफा व्यवसायाशी संबंधित व्यापारासाठी नागपुरात यायचे आहे. तसेच आशुतोषची भेट घेऊन चर्चाही करायची असल्याचे सांगितले. लक्ष्मीनगरच्या एका हॉटेलमध्ये आशुतोषची गोपाल बंका याच्याशी भेट झाली. बंका याने कोलकातामध्ये त्याच्या दोन फर्म आहेत, ज्या सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. मोठ्या प्रमाणात सोन्याचा व्यवहार होतो आणि नागपूरचे अनेक व्यवसायी त्याच्याशी व्यवहार करतात. कोलकाता येथून स्वस्त किंमतीत सोने उपलब्ध केले जाईल. ज्याची नागपुरात विक्री करून बक्कळ नफा कमावता येऊ शकतो. मात्र त्यासाठी पैसे आधी द्यावे लागतील, असे सांगून जाळ्यात अडकवले.
केवळ 1 किलो सोने मिळाले
आशुतोषच्या कुटुंबाने त्याच दरम्यान वडिलोपार्जित संपत्ती विकली होती. यामुळे त्यांच्याकडे पैसेही होते. ते बंका यांच्याशी व्यावसाय करण्यास तयार झाले. 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016 दरम्यान आशुतोषने आपल्या फर्मच्या खात्यातून आरोपींच्या फर्मच्या खात्यात 4.31 कोटी रुपये आरटीजीएस केले. सर्व सोने नागपुरात मिळणार होते, मात्र बंका कुटुंबाने केवळ 1 किलो सोने नागपुरात पाठवले. या सोन्याची किंमत 30 लाख रुपये होती. उर्वरित सोने पाठविण्यासाठी ते टाळाटाळ करू लागले. बरेच दिवस लोटूनही त्यांनी माल पाठवला नाही. आशुतोषने बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. अखेर आशुतोषने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाच्या आदेशावर बजाजनगर पोलिसांनी फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्रासह विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :