नागपूर : हाणामारी, चोरी, लूट, खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांसाठी राज्यात नेहमीच चर्चेत असणाऱ्या उपराजधानी नागपुरात अवघ्या आठ तासात दोघांचा खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर गेल्या पंधरा दिवसात सहा जणांच्या हत्या झाल्या आहेत. महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये पावलोपावली पोलीस बंदोबस्त असताना ही शहरात गुन्हेगारी बोकाळली आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही गेल्या दोन-तीन दिवसात खुनाच्या घटना वाढल्याने नागपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपुरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.
राज्याच्या उपराजधानीत शुक्रवारी हत्येच्या दोन घटना घडल्या. खुनाची पहिली घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल परिसरसतील गांधी गेटजवळ काल सकाळी साडे दहा वाजता घडली. अत्यंत वर्दळीच्या गांधी गेटजवळ दोन आरोपींनी संगंमताने शानु उर्फ शहनवाज या कुख्यात गुंडाचा खून केला. शानू गांधी गेट जवळून अॅक्टिवा गाडीने जात असताना दोघांनी पाठलाग करून त्याला अडविले आणि त्यानंतर धारदार शस्त्राने अनेकांच्या देखत वार करत हत्या केली. ही हत्या प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान हत्येची दुसरी घटना शुक्रवारी दुपारनंतर नागपुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सप्तक नगरात घडली आहे. सप्तक नगर भागात एकट्याच राहत असलेल्या 62 वर्षीय विजयाबाई पांडुरंग तिवलकर यांची हत्या करण्यात आली. विजया तिवलकर राज्य राखीव पोलीस दलातून स्वयंपाकी पदावरून 2017 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सप्तक नगर येथील घरी एकट्याच राहत होत्या. त्यांना मुलगा राज्य राखीव पोलीस दलात शिपाई असून तो त्याच्या पत्नीसह एसआरपीएफ वसाहतीतील क्वॉटर्समध्ये वेगळा राहतो. शेजारी राहणाऱ्या लोकांनी काल विजया यांना पाहिले होते, मात्र आज सकाळपासून त्या कुणाला दिसल्या नव्हत्या. दुपारी एक वाजता घरचे घरकाम करणारी मोलकरीण जेव्हा आली तेव्हा तिला घरच्या बेडरूममध्ये विजया पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आला. त्यांच्या डोक्यावर जखमा होत्या. मोलकरणीने आरडा ओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सदर महिलेच्या घरातील वस्तू आणि अंगावरील दागिने जसेच्या तसे होते, त्यामुळे चोरी करण्यासाठी ही हत्या झाली नसावी असा प्राथमिक अदाज व्यक्त होतं आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणासाठी हत्या झाली याता तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान अवघ्या आठ तासात झालेल्या या दोन खुनांमुळे राज्याच्या उपराजधानी पुन्हा एकदा हादरली आहे