नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या काही वर्षामध्ये या शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अगदी शुल्लक कारणांमुळे नागपुरात लोकांच्या हत्या होत आहेत. गेल्या पाच दिवसात नागपूरच्या वेगवगेळ्या भागात घडलेल्या हत्येच्या तीन घटनांमुळे नागपुरात रस्त्यावरील गुंडगिरीसमोर लोकांच्या जीवाचे मोल नाही का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.


पहिली घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत धुळवडच्या दिवशी घडली. मोक्षधाम जवळ पार्किंग स्टॉल चालवणाऱ्या लखन गायकवाड यांची दोन जणांनी हत्या केली. चेतन मंडल आणि तन्मय नगराळे अशी आरोपींची नावे असून आरोपी आणि मयत एकमेकांना ओळखत होते. संध्याकाळच्या सुमारास मोक्षधाम परिसरात तिघांची भेट झाली आणि मद्यपान करताना त्यांच्यातला जुना वाद उफाळून आला. यातूनच आरोपींनी धारदार शस्त्रानं लखन गायकवाडवर हल्ला करत त्याची हत्या केली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला असून आरोपी फरार आहेत.
 
दुसरी घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत गवळीपुरा भागात 27 मार्च रोजी घडली होती. अक्षय बागडे नावाच्या एका कबुतरबाजाची (कबुतर उडविणारा) राजा शेख नावाच्या दुसऱ्या कबुतरबाज तरुणाने हत्या केली होती. कारण होतं ते कबुतर उडविण्याचा शर्यतीत राजा शेखचे काही कबुतर अक्षय बागडे याच्या कबुतरांसह चालले गेले होते. कबुतरबाजीमध्ये ज्याचे कबुतर दुसऱ्या कबुतरांसोबत चालले जातात तो पराभूत मानला जातो. याच रागाने राजा शेखने अक्षय बागडेंची भोसकून हत्या केली  होती.


तिसरी घटना 26 मार्च रोजी जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत बाराखोली जवळील श्रावस्ती बौद्ध विहार जवळ घडली. या घटनेत काही गुन्हेगारांनी शैलेश बोदेले नावाच्या 32 वर्षीय तरुणाला विहिरीत फेकून त्याची हत्या केली. कारण शैलेश बोदेले यांच्या भाच्याने या गुन्हेगारांच्या धाकदपटशाहीला त्याच भाषेत उत्तर दिले होते. रागावलेले तीन गुंड रात्रीच्या वेळेला बोदेले यांच्या घरात घुसले आणि त्यांनी शैलेश बोदेले यांना उचलून श्रावस्ती बौद्ध विहार परिसरात नेले आणि तिथे मारहाण करत शैलेशला विहिरीत फेकून दिले. त्यात बुडून शैलेश यांचा मृत्यू झाला.


विशेष म्हणजे माजी आणि आजी हे दोन्ही गृहमंत्री हे नागपुरातीलच आहेत. तरीही या शहरात गुन्हेगारी वाढत असून रस्त्यावरील गुंडगिरीसमोर लोकांच्या जीवाचे मोल राहिले नाही. 


महत्वाच्या बातम्या :