Nagpur News नागपूर :  बनावट बँक तयार करून खातेदारांचे लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात सावनेर पोलिसांना यश  (Nagpur Police) आले आहे. 21 ऑक्टोबर 2021 दाखल झालेल्या तक्रारीनंतर फसवणूक (Fraud) करणाऱ्या इसमाने पळ ठोकला होता. मात्र गेली अनेक वर्ष पोलिसांना गुंगारा देण्यात या आरोपीला  यश आले होते. अखेर पोलिसांनी सापळा रचत या संशयित आरोपीला अटक केली आहे. मेहेर बाळकृष्ण परतेकी असे या 42 वर्षीय संशयित आरोपीचे नाव असून सावनेर येथील किल्लापुरा येथील ते रहिवासी आहे. 


तब्बल 27 लाख 70 हजार रुपयांची फसवणुक


या प्रकरणातील संशयित आरोपी मेहेर बाळकृष्ण परतेकी यांनी सावनेर शहरात असलेल्या बले कॉम्पलेक्समध्ये 2018 ला वित्तीय संस्था स्थापन केली होती. या संस्थेमध्ये त्यांच्यासह ईतर सहा लोक काम पाहत होते. या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था बँकीग सबंधी मुदत ठेवी ठेवणे, दैनंदीन ठेवी जमा करणे, कर्ज वाटप करणे, आदी सर्व कामे करीत होती. दरम्यान संशयित आरोपी मेहेरने या वित्तीय संस्थाच्या माध्यतून अनेकांना  खोटी आश्वासने देत ईतर बँकेपेक्षा जास्त व्याजासह कमी मुदतीत जास्त पैशाचा परतावा करण्याचे प्रलोभन लोकांना दिले. ज्यामध्ये बहुतांश ग्रामीण भागातील लोकांना अशा प्रकारचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर  मेहेरने मोठी रक्कम जमा करुन ठेवीदारांना ठेव पावत्या दिल्या होत्या. मात्र लोकांनी मुदतीत असलेले  त्याचे पैसे परत मागणी केली असता, मेहेर आणि त्यांच्या संस्थेने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. मात्र नंतर ठेवीदारांनी पैसे परताव्यासाठी तगादा लावल्याने मेहेरने संस्था बंद करून पळ ठोकला होता. 


तीन वर्षांनंतर पोलिसांना आले यश


ही बाब ठेवीदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यातीलच एक असलेले बाबा टाटांबर गुरु दुर्गानंद (72, रा. छिंदवाडा रोड, सावेनर) यांनी पोलीस स्टेशन गाठत घडलेला सर्व प्रकार सांगितलं आणि  सावनेर पोलीस स्टेशन येथे 21 ऑक्टोबर 2021 ला रितसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार मेहेरने एकून 27 लाख 70 हजार रुपयांची फसवणुक केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी मेहेरचा सतत पाठलाग सुरू केला होता. मात्र त्याला पोलिसांना गुंगारा देत पळ काढण्यात यश आले होते. अखेर तीन वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर या संशयित आरोपी मेहेरला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.


चौकशी दरम्यान या गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग अनिल म्हस्के, ठाणेदार मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी पार पाडली.


इतर महत्वाच्या बातम्या