Nagpur Cancer Institute: नागपूर (Nagpur) शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर जामठा परिसरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (National Cancer Institute) आहे. सुमारे साडेसात लाख क्षेत्रफळात विस्तारलेला हे रुग्णालय धर्मादाय पद्धतीने चालणारे देशातला सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय आहे. 410 बेड्सची सुविधा असलेला हे रुग्णालय म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांचे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. आपल्या स्वयंसेवकांनी केलेल्या या उत्कृष्ट कामाला पाहून सरसंघचालकही भारावून गेले आणि त्यांनी या आरोग्य सेवेच्या प्रकल्पाला आशीर्वाद देतानाच जे शब्द उच्चारले ते म्हणजे शाब्बास... या शब्दांसह देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कृष्टतेची पावती दिली आहे. मात्र, त्याच वेळी पक्ष नेतृत्वाची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय देखील ठरली आहे... नागपुरात नेशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पणाच्या माध्यमातून कॅन्सर या आजारासंदर्भात जागतिक दर्जाची आरोग्य सोय फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी उपलब्ध झाली आहे...
तसेच देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले, 'ही संघाची प्रेरणा होती त्यामुळे आम्ही हे करू शकलो, रुग्णालय जागतिक दर्जाचे असावे असे पहिल्याच दिवशी ठरविले होते.' यापुढे ते म्हणाले की 'गरिबांना सेवा देण्याचा निर्धार केल्यामुळे रुग्णालयात श्रीमंत आणि गरिब असा भेद केला जाणार नाही आहे'.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीसांच्या या ड्रीम प्रोजेक्टला 'आरोग्य मंदिर' अशी पावती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले की, 'हे रुग्णालय नाहीतर आरोग्य मंदिर आहे, फडणवीस यांची जिद्द आणि कॅन्सर रुग्णासाठी त्यांच्या ध्यासाचे हे आरोग्य मंदिर आहे'. तसेच राज्यातील सर्व नेत्यांनी यातून प्रेरणा घ्यायला हवी असे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
तर या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली.. परंतु त्यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन शैलेश जोगळेकर यांनी केले.
काल रात्री अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं... पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या मृत्यूमुळे देशात राष्ट्रीय शोक आहे आणि त्यामुळे अमित शहा यांनी सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती... तर काहींनी छत्तीसगडमधील दंतेवाड्यात झालेल्या नक्षली हल्ल्यामुळे अमित शहा आले नसल्याचे कारण सांगितले.. मात्र कार्यक्रमात अमित शहा यांचा लेखी संदेश वाचून दाखवण्यात आला आणि त्यामध्ये अमित शाह यांनी 'या कार्यक्रमात येण्याची इच्छा असूनही आकस्मिक कारणांमुळे या सोहळ्यात येऊ शकलो नाही... मानवसेवेच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत'.. असे मत मांडले होते...
अमित शहा या कार्यक्रमात का आले नाही याबद्दल सर्वांचे तर्क वेगवेगळे आहेत... काहींना त्यामागे खरंच काही आकस्मिक कारण असल्याचे वाटतंय.. तर काहींना त्यामागे राजकारण आणि राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती कारणीभूत असल्याचे वाटत आहे... पुढील काही दिवस त्यासंदर्भात चर्चाही होत राहील मात्र नागपुरात उभा राहिलेला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरग्रस्त लाखो रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी भक्कम कार्य करत राहील हे निश्चित...