MVA Rally In Nagpur : नागपूरमध्ये 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) दुसरी सभा होत आहे. एकीकडे आयोजकांची सभेसाठी तयारी सुरु असताना दुसरीकडे स्थानिकांचा सभेला विरोध केला आहे. यातच आता व्यासपीठ आणि सुरक्षा सर्कल डी सोडले तर उर्वरित जागेत फक्त 12 हजार खुर्च्या मावतील इतकीच जागा शिल्लक राहत आहे. त्यामुळे एक लाखाची सभा (Rally) घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकताना दिसत आहे. त्यामुळे मैदानाच्या निवडीवरुन महाविकास आघाडीचे सभेचे नियोजन फसले का अशी चर्चा रंगली आहे?
नागपूर सुधार प्रन्यासने या सभेला परवानगी दिली आहे. महाविकास आघाडीने देखील या मैदानासाठी पैसे भरले आहेत. परंतु स्थानिकांचा या सभेला विरोध वाढत आहे. न्यायालयात जाण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे. आधीच या सभेत अनेक विघ्न येत असताना आता अडचणी समोर आल्या आहेत. सभेसाठी भव्य स्टेज असेल आणि सुरक्षा सर्कल डी असणार आहे. ही जागा सोडली तर केवळ 12 हजार खुर्च्या मावतील एवढीच जागा शिल्लक राहणार आहे. आम्ही या सभेसाठी पूर्व विदर्भातून साधारण एक लाख लोकांची गर्दी जमवू असं महाविकास आघाडीचे नेते आठवडाभरापूर्वी बोलत होते. परंतु सध्या इथे मावणाऱ्या खुर्च्यांची संख्या पाहिली तर ती केवळ 12 हजारांच्या घरात आहे. त्यामुळ सभेचं नियोजन फसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
स्थानिकांचा सभा घेण्यास विरोध
दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर सभा घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. मैदानालगतच स्थानिक नागरिकांनी काल (11 एप्रिल) धरणे आंदोलन केलं, ज्याचं नेतृत्त्व भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. दर्शन कॉलनी सद्भावना नगर इथल्या मैदानावर नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून सुमारे एक कोटींचा खर्च करुन विविध क्रीडा प्रकार आणि स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. मैदानावरील क्रीडासोयी राजकीय सभेमुळे खराब होतील, खेळाडूंना अनेक दिवस खेळता येणार नाही असा आक्षेप स्थानिकांनी नोंदवला आहे. तर मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासने महाविकास आघाडीला दिलेले परवानगी रद्द करावी, अशी मागणी कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
दर्शन कॉलनीच्या मैदानावरच सभा घेण्यावर मविआ ठाम
नागपुरातील दर्शन कॉलनी इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची 16 एप्रिलला सभा होत आहे. एकीकडे दर्शन कॉलनीतील मैदान राजकीय सभेसाठी देण्यात येऊ नये अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यांना भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांच्या पाठिंबाही आहे. असे असताना महाविकास आघाडी मात्र दर्शन कॉलनीच्या मैदानावरच वज्रमूठ सभा घेण्यावर ठाम आहे. या वज्रमूठ सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ फिरायला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा
MVA Rally In Nagpur : मविआच्या १६ एप्रिलला नागपुरात होणाऱ्या सभेच्या स्थानावरुन भाजपमध्ये दोन गट