MVA Rally In Nagpur : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) 16 एप्रिलला नागपुरात (Nagpur) होऊ घातलेल्या सभेच्या स्थानावरुन भाजपमध्येच (BJP) दोन सूर असल्याचे समोर आले आहे. कारण महाविकास आघाडीच्या सभेसाठी दर्शन कॉलनीचे मैदान देऊ नये असे पत्र भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासनाला दिल्यानंतर भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मात्र दर्शन कॉलनीच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा झाल्यास आम्हाला आक्षेप नाही असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे भाजपमध्ये महाविकास आघाडीच्या सभा स्थानाबद्दल काय भूमिका घ्यावी याविषयी एकवाक्यता नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सभेच्या स्थानावरुन भाजपमध्ये एकवाक्यता नाही?
छत्रपती संभाजी नगरमधील वज्रमूठ सभेनंतर महाविकास आघाडीची सभा 16 एप्रिल रोजी नागपुरात होणार आहे. त्या सभेसाठी काँग्रेस पक्षाने नंदनवन परिसरातील दर्शन कॉलनीचे मैदान निश्चित करत प्रशासनासाकडे मैदान उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, दर्शन कॉलनीच्या मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासकडून काही निर्णय घेतला जाईल, या पूर्वीच स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासकडे पत्र देत दर्शन कॉलनीच्या मैदानात शासकीय निधीतून अनेक क्रीडा सोयी निर्माण करण्यात आल्या असून त्या ठिकाणी राजकीय सभा घेतल्यास त्या क्रीडा सोयी खराब होतील. तसेच नागरिकांनाही त्रास होईल असं सांगितलं.
तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदार आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मात्र दर्शन कॉलनीच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा झाल्यास आम्हाला आक्षेप नाही असे मत व्यक्त केले आहे. भाजपच्या दोन आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे भाजपमध्ये महाविकास आघाडीच्या सभेबद्दल काय भूमिका घ्यावी याची एकवाक्यता नाही का आ प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपचं षडयंत्र असू शकते : नाना पटोले
दरम्यान काँग्रेसने यावर सावध प्रतिक्रिया देत हे भाजपचे षडयंत्र असू शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे. 16 एप्रिलच्या सभेबद्दल आम्ही स्थानिक नेत्यांशी बोलून आज जागा निश्चित करु. विरोध स्थानिक नागरिकांचा आहे की त्यामागे भाजपचे षडयंत्र आहे हे माहित करावे लागेल. कारण भाजप निर्लज्ज पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेस 24 तासात सभेचं स्थान निश्चित करणार
येत्या 24 तासात काँग्रेस पक्ष नागपुरातील सभेबद्दल स्थान निश्चितीचे अंतिम निर्णय घेणार आहे. नागपुरात अनेक मोठे मैदान उपलब्ध असताना दर्शन कॉलनीचे मैदान तुलनेने खूप लहान आहे. त्यामुळे मैदानावर भरगच्च गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेस तुलनेने लहान मैदानाच्या शोधात आहे का असाही प्रश्न या वादानंतर निर्माण झाला आहे.
VIDEO : Nagpur MVA Sabha : मविआच्या सभेच्या ठिकाणावरुन भाजपात मतप्रवाह?