Ashish Deshmukh On Nana Patole : "माझ्याऐवजी नाना पटोले यांची चौकशी करा. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणाला न सांगताच दिला आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडलं," असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. "महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यामागच्या षडयंत्राचा नाना पटोले (Nana Patole) हे देखील भाग होते," असे आशिष देशमुख म्हणाले. वेळेच्या आधीच मी नोटीसला उत्तर देईन. माझी भूमिका पक्ष, राहुल गांधी आणि ओबीसी हिताची होती. त्यामुळे माझे म्हणणे पक्ष मान्य करेल, मला पक्षातून काढणार नाही, असा विश्वासही आशिष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.


नाना पटोले यांना खोका मिळतो असा माझा शब्द होता. त्याचा जो अर्थ तुम्हाला लावायचा आहे, ते तुम्ही लावा. माझी संशयाची सुई नाना पटोले यांच्याकडे असल्याने पक्षाकडे त्यांची चौकशीची मागणी मी करत असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.  


'नाना पटोले यांची चौकशी केल्यास सर्व सत्य समोर येईल'


"नाना पटोले यांनी ज्या दिवशी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले, तेव्हापासूनच संशयाची सुई त्यांच्याकडे आहे. चंद्रकांत हांडोरे यांचा पराभवातही त्यांचा सहभाग असू शकतो. त्यामुळे पक्षाने नाना पटोले यांची चौकशी केल्यास सर्व सत्य समोर येईल, असे देशमुख म्हणाले. "नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते. शरद पवार आणि संजय राऊत यांनाही काही माहित नव्हते. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे इतर माजी मुख्यमंत्र्यांनाही त्याची माहिती नव्हती. त्यामुळे नाना पटोले यांच्यासंदर्भात संशय बळावतो, असे आशिष देशमुख म्हणाले.


'संशयाची सुई नाना पटोलेंकडे असल्याने चौकशीची मागणी'


नाना पटोले यांना खोका मिळतो असा माझा शब्द होता. त्याचा जो अर्थ तुम्हाला लावायचा आहे, ते तुम्ही लावा. माझी संशयाची सुई नाना पटोले यांच्याकडे असल्याने पक्षाकडे त्यांची चौकशीची मागणी मी करत असल्याचे आशिष देशमुख म्हणाले. "नाना पटोले यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळतो. त्यामुळे ते संभाजी नगरच्या सभेत गैरहजर होते," असा गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी 4 एप्रिल रोजी केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. तब्येत बरी नसल्यामुळे नाना पटोले गैरहजर असल्याचं इतर घटक पक्षांकडून सांगण्यात आलं होतं. परंतु आपली तब्येत ठणठणीत असल्याचं पटोले म्हणाले होते.


राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागितल्यास काँग्रेसचा फायदाच : आशिष देशमुख


दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओबीसी समाजाची (OBC Community) जाहीर माफी मागावी, माझे हे वक्तव्य पक्षाच्या हिताचेच आहे. कारण राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर राफेल आणि चौकीदार चोर आहे, या प्रकरणात जाहीर माफी मागितली आहे. त्यामुळे 54 टक्के मतदार असलेल्या ओबीसींची माफी मागितल्यावर काँग्रेसचे नुकसान नाही, तर फायदाच होईल, असे आशिष देशमुख यांनी सांगितले.


VIDEO : Ashish Deshmukh : नाना पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद संशयास्पद सोडलं, देशमुखांचा रोख कशावर?